नांदणी (ता.शिरोळ) : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
तब्बल ३२ वर्षे पंचक्रोशीतील जनमानसात आपुलकीने स्थान निर्माण करणारी आणि नांदणी मठ संस्थानाची राजशाही ओळख ठरलेली ‘महादेवी’ हत्तीण अखेर निघून गेली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिची गुजरातच्या हत्ती पुनर्वसन केंद्रात रवानगी करण्यात आली. यानंतर नांदणीसह शिरोळ तालुक्याच्या परिसरात एक वेगळीच शोककळा पसरली असून, ‘महादेवी’ च्या आठवणी गावागावात उरल्या आहेत.
पंचक्रोशीत ‘महादेवी’ची छाप
नांदणी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरढोण आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आठवड्यातून एकदा तरी तिचे हमखास दर्शन घडायचे. लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाचे ती लाडकी होती. तिच्या मार्गावर लोक स्वतःहून आवडीचा खाऊ घेऊन उभे राहायचे. खाऊ घेतल्यानंतर ती डोक्यावर सोंड ठेवून आशीर्वाद द्यायची हा तिच्या आणि लोकांच्या संबंधाचा गहिरा भावनिक धागा होता.
नांदणी मठ संस्थानाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची यात्रा ‘महादेवी’ च्या दर्शनाशिवाय पूर्णच होत नसे. २४ तीर्थंकरांचे दर्शन झाल्यावर भाविक हमखास तिच्या दर्शनासाठी येत आणि खाऊ देत.
३२ वर्षांचा अतूट सहवास
कर्नाटकातील जंगलातून वयाच्या सहाव्या वर्षी नांदणी मठ संस्थानात दाखल झालेल्या ‘महादेवी’ने गेल्या ३२ वर्षांत महाराष्ट्र-कर्नाटकातील विविध पंचकल्याण पूजा महोत्सव, धर्मयात्रा, मिरवणुका, सर्वधर्मीय उत्सव यामध्ये सहभाग घेतला. तिचा डामडौल, राजेशाही थाट आणि आपुलकीची भावना या गोष्टींनी तिने केवळ मठाचे नव्हे, तर संपूर्ण परिसराचे मन जिंकले.
आरोग्य तपासणी आणि लाखांचा खर्च
‘महादेवी’च्या आरोग्याची दर तीन ते सहा महिन्यांनी तपासणी केली जात होती. यासाठी खासगी व शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांचा समावेश असायचा. तिच्या खाण्या-पिण्याचा, आरोग्य राखण्याचा खर्च दरमहा लाख रुपयांपर्यंत जात होता. धरणगुत्ती येथे मठ संस्थानची सतरा एकर जमीन खास तिच्या चाऱ्यासाठी राखून ठेवण्यात आली होती. ऊस, मका, गवत असा नैसर्गिक चारा पिकवला जात होता. विशेष म्हणजे उसाचा चारा ‘महादेवी’चा आवडता होता आणि त्यावरच विशेष भर दिला जात असे.
‘महादेवी’ची शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी दररोज १० किमीचा परिसरातील ठरलेला फेरफटका असायचा. त्यामुळे प्रत्येक गावात आठवड्यातून एकदा तरी तिच्या दर्शनाचा योग साधत असे. ही सवय इतकी पक्की होती की गावांमध्ये ‘महादेवी’ची वाट पाहणं, तिला खाऊ देणं आणि आशीर्वाद घेणं हा एक ‘उत्सव’च झाला होता.
वाढदिवसाची पर्वणी
‘महादेवी’चा वाढदिवस म्हणजे मठ संस्थानातील खास सोहळा असायचा. बेडक्याळ, शेडबाळ, कुंथुगिरी, कुंजवन येथील इतर तीन हत्ती तिच्या वाढदिवसाला निमंत्रित असायचे. केक कापणे, गोडधोड भोजन आणि भाविकांच्या भेटी-गाठी यामुळे हा वाढदिवस एकमेव असा ‘हत्ती उत्सव’ बनला होता. आता ही परंपराही विस्मृतीत जाईल.
‘महादेवी’ नांदणी मठ संस्थानातच राहावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयापासून दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत मठ संस्थानने खटला लढला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती वन्य प्राण्यांच्या कायद्याअंतर्गत हत्ती केंद्रात ठेवण्याचे आदेश दिले. त्याचा आदर करत मठ संस्थानने तिला गुजरातच्या हत्ती केंद्राकडे सुपूर्द केले. तिला निरोप देताना अनेक भाविकांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी तिला कुटुंबातील सदस्यासारखे मानले होते. ‘महादेवी’ चा निरोप म्हणजे नांदणी परिसरातील एक युग संपल्यासारखे आहे. तिच्या आठवणी, तिचा थाट, तिची माया हे सारे आज लाखों भक्तांच्या मनात खोलवर कोरले गेले आहे.
——————————————————————————————