
पंचगंगा नदी पुलावर रास्ता रोको ; पोलिसांचा हस्तक्षेप
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मंगळवारी पुणे – बेंगलोर महामार्गावरील तावडे हाॅटेल जवळील पंचगंगा नदी पुलावर शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तीन तास पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प ठेवण्यात आली होती.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते पंचगंगा नदी पुलावर पोहोचले आणि त्यांनी नदीत उडी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट
पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ झटापटही झाली. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना पुलावरून बाजूला केले आणि कोणालाही नदीत उडी मारण्याची संधी दिली नाही. यामुळे एक मोठा अनुचित प्रकार टळला.
मोठा पोलिस बंदोबस्त
रास्ता रोको आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता पोलिस प्रशासनाने पंचगंगा नदी पुलावर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. जवळपास सातशे पोलिसांचा बंदोबस्तात होते. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
राजू शेट्टींचा इशारा
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत सांगितले की, “शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, अन्यथा फणा काढल्याशिवाय राहणार नाही. शक्तीपीठ महामार्गामुळे दोन जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न सरकार करत असेल, तर आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. बंदी आदेश मोडल्याची कारवाई झाली, तरी चालेल. सरकारने कितीही दडपशाही केली, तरी हे आंदोलन होणारच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाची तमा न बाळगता शेतकरी रस्त्यावर
“जमीन वाचवण्यासाठी शेतकरी पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर उतरले आहेत. सत्ताधाऱ्यांनी आम्हाला पावसात आंदोलन करून दाखवावं, म्हणजे कळेल ते भाडोत्री आहेत की आणखी काही,” असा टोला शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
“या महामार्गामुळे दोन जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल, तर मला कोणीही रोखू शकत नाही. बंदी आदेश मोडल्याची कारवाई झाली, तरीही आम्ही मागे हटणार नाही. सरकारने कितीही दडपशाही केली, तरी हे आंदोलन होणारच आहे,” असं ठाम मत शेट्टींनी व्यक्त केलं. यावेळी शेट्टींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं, “शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी पांडुरंगाने फडणवीस यांना द्यावी, अन्यथा आम्ही संघर्षासाठी तयार आहोत.”
” शेती वाचवा देश वाचवा” असा मजकूर लिहिलेल्या टोप्या साऱ्यांनी परिधान केल्या होत्या. याप्रसंगी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. साऱ्यांनीच शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला धारेवर धरले. शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी लबाडण्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या सोबत सामान्य नागरिक ही शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतीपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार साऱ्यांनी व्यक्त केला.
-
पंचगंगा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन.
-
तीन तास पुणे – बेंगलोर महामार्गावरील वाहतूक ठप्प.
-
काही कार्यकर्त्यांनी नदीत उडी टाकण्याचा प्रयत्न; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप.
-
पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट.
-
राजू शेट्टींचा सरकारला इशारा – आंदोलन आणखी तीव्र होणार.
माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू आवळे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर, बाबासाहेब देवकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुरेश चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांणवर, जयकुमार कोल्हे, तानाजी धनवडे, राम शिंदे, सचिन शिंदे, विक्रम पाटील, स्वस्तिक पाटील, राहुल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, शिक्षक नेते भरत रसाळे आदींच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली.





