कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देवून, डिसेंबर महिन्याच्या पूर्वी जास्तीत जास्त योजना कार्यान्वित करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता माधुरी परीट, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा तथा समितीचे सदस्य सचिव अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण तसेच सर्व संबंधित उपअभियंता उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, ७५ टक्केंपेक्षा जास्त भौतिक कामे पूर्ण झालेल्या योजना तातडीने पूर्ण कराव्यात. उपअभियांता स्तरावर सूक्ष्म नियोजन करावे. तसेच उर्वरीत कामांचे पूर्णत्वाचे वेळापत्रक तयार करा. ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी २०८ योजना प्रलंबित आहेत. त्याबाबत त्रुटी दूर करून ग्रामपंचायतींना विश्वासात घ्या. सर्व योजना समन्वयाने हस्तांतरित कराव्यात. सर्व पाणी पुरवठ्याची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण मार्गी लावण्यासाठी योग्य नियोजन करून कामांचा प्रगती अहवाल वेळेत सादर करा. महावितरण विभागाने येत्या ७ दिवसात प्रलंबित कोटेशन वितरित करावीत. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी योजनांबाबत माहिती दिली.
हर घर जल योजनेअंतर्गत शाहूवाडी तसेच गगनबावडा तालुक्यातील यंत्रणेचे मार्गदर्शन व मदत घेऊन उर्वरीत तालुक्यांनी मिळून १०० टक्के काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत १५ योजनांच्या संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यस्तरावर मंजुरी प्रक्रियेत असलेल्या योजनेच्या त्रुटी दूर करण्यासाठी समन्वय ठेवा. तसेच सुधारित आराखडे करीता आवश्यक असलेली माहिती संकलित करून सर्व योजनांना वेळेत सुधारित मान्यता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत स्वच्छता विभागाकडील विविध योजनांचाही आढावा घेण्यात आला.
पाणी व स्वच्छता मिशन संख्यात्मक माहिती
* जिल्हयातील एकूण कुटुंबसंख्या- ६,८४,१६२
* पैकी नळजोडणी पूर्ण – ६,८२,८६८
* उर्वरीत नळजोडणी- १२९४
* पाणी पुरवठा एकूण योजना- १२३७
* यातील पूर्ण- ६०१
* निव्वळ जल जीवन- १०१०
* पैकी पूर्ण- ३८६
* ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण ३५२ पैकी १७८
* हर घर जल घोषित गावे- ११९१ पैकी ११७०
* हर घर जल घोषित तालुका- गगनबावडा
* एमएसईबी कडून आवश्यक वीज कनेक्शन- ३५५ योजनांसाठी
* पैकी पूर्ण- ३०, ए वन फॉर्म सादर- ३४०
————————————————————————————



