नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. ओपेक आणि ओपेक प्लस या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पुरवठा वाढल्याने तेलाच्या किमती खाली येत आहेत. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत सध्याच्या पातळीपेक्षा प्रति बॅरल तब्बल 10 डॉलरची घसरण होऊ शकते.
सध्या कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत ?
-
आखाती देशांचे कच्चे तेल ब्रेंट क्रूड सध्या ६८.६१ डॉलर प्रति बॅरल या दराने व्यवहार करत आहे.
-
सकाळच्या सत्रात ही किंमत ६७ डॉलर प्रति बॅरल पर्यंत खाली आली होती.
-
१९ जूनपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे १२ टक्क्यांची घसरण झाली आहे.
-
दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाच्या (WTI) किमती सध्या ६७ डॉलर प्रति बॅरल आहेत, तर सत्रादरम्यान या किमती ६५.५५ डॉलर प्रति बॅरल पर्यंत घसरल्या होत्या.
-
अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमतीतही १९ जूनपासून सुमारे ११ टक्क्यांची घट झाली आहे.
घसरणीमागील कारणं
-
ओपेक आणि ओपेक प्लस देशांकडून उत्पादन वाढ सुरू आहे.
-
अमेरिकेने देखील कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवला आहे.
-
इराण-इस्रायलमधील युद्धबंदीनंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कमी झाला आहे.
-
पुरवठ्यात कोणताही अडथळा नसल्याने बाजारात स्थिरता आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर परिणाम
-
तज्ज्ञांच्या मते, जर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ६० डॉलरच्या खाली गेल्या, तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ५ रुपयांची घट होऊ शकते.
-
जर असे झाले, तर दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर सध्या जवळपास ९५ रुपये प्रति लिटरवर आहेत, ते ९० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात.
-
मार्च २०२४ पासून देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यावेळी केवळ प्रति लिटर २ रुपयांचीच कपात करण्यात आली होती.
जगभरात वाढत्या पुरवठ्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. ही घसरण ऑगस्टपर्यंत कायम राहिल्यास भारतातील नागरिकांना पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा मिळू शकतो. मात्र, याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
———————————————————————————-



