मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शासकीय कार्यालयांमध्ये कामाच्या वेळेत वाढदिवस, निवृत्ती समारंभ, इतर वैयक्तिक कार्यक्रम साजरे केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होतोय आणि नागरिकांच्या सेवेला तडे जात आहेत. यावर आता महसूल विभागाने कडक पवित्रा घेतला आहे.
महसूल विभागाचे परिपत्रक
महसूल विभागाकडून नुकतेच एक परिपत्रक काढण्यात आले असून, त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत शासकीय कार्यालयात स्वतःचे वैयक्तिक समारंभ विशेषतः वाढदिवस साजरे करत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. यामुळे कार्यालयीन वेळ वाया जातो, तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागते.
या परिपत्रकात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशाप्रकारचे समारंभ महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार पूर्णपणे अनुचित असून, यावर त्वरित बंदी घालण्यात येत आहे.
कारवाईची भूमिका
जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख पुणे डॉ. सुहास दिवसे यांनी हे परिपत्रक जारी करताना सांगितले की, त्यांच्या कार्यालयासह अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागीय व तालुका स्तरावरील कार्यालयांमध्ये यापुढे कार्यालयीन वेळेत कोणतेही वैयक्तिक समारंभ साजरे करू नयेत.
जर असे प्रकार निदर्शनास आले, तर संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने समज देऊन आवश्यक ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांमध्ये पुन्हा शिस्तबद्ध आणि कार्यक्षम वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीला आळा बसेल, आणि प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.