कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या शाहू मिलचे पुनर्जीवन करून ती पुन्हा त्याच जोमाने सुरू करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात आज नवीन राजवाडा येथे समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली.
शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून उभारलेली ही मिल पुन्हा कार्यान्वित झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासह कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, अशी भूमिका समितीने मांडली.
दरम्यान, शाहू मिल परिसरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयाचे सर्वपक्षीय कृती समितीने स्वागत केले.






