कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
इंदुमती शाळेच्या प्रवेशद्वाराशेजारील जुनी भिंत काही दिवसांपूर्वी कोसळली आणि त्यानंतर एक अप्रतिम ऐतिहासिक ठेवा उघडकीस आला. कोसळलेल्या भिंतीखालच्या ढिगाऱ्यातून एक सुंदर वीरगळ म्हणजेच शौर्यस्मृती दर्शवणारी दगडी शिळा आढळून आली.
शाळेतील एका कर्मचाऱ्याने ढिगाऱ्याकडे लक्ष वेधून घेतले व तिथे काहीतरी असल्याचा संशय व्यक्त केला. जेव्हा प्रशासनाने त्या जागेची अधिक खोलवर पाहणी केली, तेव्हा त्यांना एक कोरीव काम केलेली, खूपच जुनी आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली विरगळ सापडली. या विरगळावर पुरातन मराठी लिपीतील शिलालेख आणि एक योद्ध्याचे दृश्य कोरलेले असून तो कोणत्यातरी युद्धात शहीद झाल्याचे संकेत मिळतात.
स्थानिक इतिहास अभ्यासक डॉ. मंगला देशमुख यांच्या मते, ही विरगळ किमान १२ व्या ते १४ व्या शतकातील असण्याची शक्यता आहे. “ ही विरगळ म्हणजे त्या काळात झालेल्या छोट्या-मोठ्या युद्धांची आणि त्या वीरांची स्मृती आहे. अशी विरळ ठिकाणीच सापडतात,” असं त्यांनी सांगितलं.
शाळेच्या परिसरात इतका मौल्यवान ऐतिहासिक ठेवा आढळल्याने तात्काळ पुरातत्व विभागाला माहिती दिली असून, आता संपूर्ण जागा संरक्षित करण्यात आली आहे. पुरातत्व तज्ज्ञ लवकरच अधिक सखोल उत्खनन करून इतर काही ऐतिहासिक वस्तू आढळतात का, याचा शोध घेणार आहेत.
या विरगळाची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने शाळेला भेट देण्यास सुरुवात केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे यांनी या ऐतिहासिक घटनेचा शाळेच्या दृष्टीने शैक्षणिक उपयोग कसा करता येईल, याचा विचार सुरू केला आहे. “विद्यार्थ्यांना त्यांच्या इतिहासाची प्रत्यक्ष साक्ष देणारी ही एक अनोखी संधी आहे,” असं त्या म्हणाल्या.