कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला देशाचे दुसरे अंतराळवीर बनणार आहेत. ते आज १० जून रोजी अमेरिकेतील अंतराळ केंद्रातून १४ दिवसांच्या मोहिमेवर जाणार आहेत. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) यांच्या संयुक्त मोहिमेसाठी निवड झाली आहे.
शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. शुभांशु शुक्ला यांनी लखनौमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून १२वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घरी त्यांचे पालक आणि दोन मोठ्या बहिणी राहतात. त्यांची एक बहीण लखनौमध्ये शिक्षिका आहे आणि दुसरी दिल्लीमध्ये राहते.
शुभांशु शुक्लांचे वडील शंभूदयाल शुक्ला माध्यमाशी बोलताना म्हणाले, शुभांशुने एनडीएचा फॉर्म भरल्याचं आम्हाला माहिती नव्हतं. एके दिवशी त्याच्या मित्राने फोन केला, त्यावेळी आमच्या घरी लँडलाइन फोन होता. मी फोन उचलला तेव्हा त्याच्या मित्राला कळले नाही की नेमका फोन कोणी उचलला आहे. त्यानंतर तो मित्र म्हणाला की अभिनंदन तुझी एनडीएमध्ये निवड झाली आहे. तसेच शुभांशु सैन्यात भरती होण्याची तयारी करत होता, तेव्हा त्यांना शुभांशु स्वप्नाची माहिती नव्हती. खरंतर,मला शुभांशु आयएएस व्हावे असं वाटत होतं. पण शुभांशुने आपल्या करिअरची वाट स्वतः निवडली आणि तो एनडीएमध्ये गेला. शुभांशु अशा अंतराळ मोहिमेवर जातील असं त्यांच्या कुटुंबातील कुणालाही वाटलं नव्हतं.असेही त्यांचे वडील म्हणाले.
शुभांशु यांच्या आई आशा शुक्ला म्हणाल्या, तो लहानपणापासूनच खूप मेहनती होता. हट्टी नव्हता. त्याने कधीही काहीही मागितले नाही. घरी जे बनवलं जायचं ते तो खायचा आणि त्याला जे मिळेल त्यात समाधानी असायचा.
राकेश शर्मा यांच्यानंतरचे दुसरे अंतराळवीर
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला ३९ वर्षांचे असून उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. ते भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आहेत. २००६ मध्ये ते भारतीय वायुसेनेत कार्यरत झाले होते. त्यांना २ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-३० एमकेआय, मिग-२१एस, मिग-२९एस, जॅग्वार, हॉक्स डोर्नियर्स आणि एन-३२ सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला या मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले तर गेल्या ४० वर्षांत ही कामगिरी करणारे ते दुसरे भारतीय अंतराळवीर ठरतील. याआधी १९८४ मध्ये राकेश शर्मा सोव्हिएत युनियनच्या अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळात गेले होते. एक्सिओम या अंतराळ कंपनीची ही चौथी अंतराळ मोहीम आहे. तिचं नाव ‘एक्सिओम-4’ असं आहे. २०१६ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी अमेरिकन आहे. ही कंपनी व्यावसायिकदृष्ट्या अंतराळ प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी काम करते. ही कंपनी सरकारी आणि खाजगी अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याचे काम करते.
शुभांशु शुक्ला यांना अवकाशात घेऊन जाणारे अंतराळयान स्पेसएक्स रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. स्पेसएक्स ही इलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे. हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहे आणि शुभांशु शुक्ला यांच्यासोबत पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीरही असतील.