राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
१५ जूननंतर सुरु होणारा मान्सून सदृश्य पाऊस यावर्षी 20 मे नंतरच सुरू झाल्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागात भात पिकाचा धुळवाफ पेरा केला जातो. प्रत्येक वर्षी २५ मे नंतर रोहिणी नक्षत्रावर भात पिकाची पेरणी केली जाते. त्यासाठी शेतकरी १५ मे नंतर जमिनीच्या मशागतीला सुरुवात करतात.
साधारणतः २५ मे पर्यंत मशागत केल्यानंतर रोहिणी नक्षत्रावर शेतकरी भाताची पेरणी करतात परंतु यावर्षी २० मे नंतर मान्सून सदृश्य पावसाची संततधार सुरू झाल्यामुळं धुळवाफ पेरा करणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. तालुक्यामध्ये शेतकरी उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल, केळी आदि पिकं घेतात या पिकांची सध्या काढण्याची कामे सुरू आहेत. परंतु पावसाने संततधार सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसामुळं हिरावला जात आहे.
गुरांची वाळलेली वैरण अद्याप शेतामध्येच असल्यामुळे पाण्यात कुजत आहे. शेतकऱ्यांनी ताडपदऱ्या झाकून वैरण वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी वाफ्यामध्ये पाणी साचल्यामुळं वैरण कुजू लागली आहे.