…आणि त्या जखमी भगिनींना मिळालं भरीव आर्थिक सहाय्य : कोल्हापुरातील प्रतिज्ञा संस्थेचा सुंदर उपक्रम

0
389
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

गेल्या महिन्यातच एका मोठ्या अपघातात जखमी झाल्यामुळे दोन भगिनींना केवळ गेल्या तीन दिवसात तब्बल ४७  हजारांची रक्कम मिळवून देणाऱ्या प्रतिज्ञा संस्थेचा स्नेह संगीत उपक्रमाचा गौरव काही शब्दांत करणे खरंच अवघड आहे. 

फेस बुक लाईव्ह सांगीतिक मैफिली वरून गरीब आणि गरजू रुग्णांसाठी इतकी मोठी आर्थिक रक्कम जमा करणे, ती तशीच्या तशी उचलून त्या गरजवंताला देणे, अनेकदा त्या गरजू रुग्णाचा नंबर आणि त्याचेच बँक खात्यात ही रक्कम दानशूरांना जमा करायला सांगणे… या सगळ्या कृतीतून या संस्थेचे सर्वेसर्वा असणाऱ्या प्रशांत जोशी यांनी गेल्या २५ वर्षांपासून आपली विश्वासार्हता जनमनांत टिकवून ठेवली आहे. हेच या संस्थेच्या यशाचं खरं गमक आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रशांत जोशी यांच्या फेस बुक वरून दिवसभरात या सांगीतिक मैफली केल्या जातात. मैफिलीतून गरजूंच्या मदतीसाठी आवाहन केले जाते.

एकीकडे युद्धाची परिस्थिती, तर दुसरीकडे घरात, गावात, शहरात एकमेकांमध्ये उगाच असणारा ताण.. भवताली घडणाऱ्या असंख्य बऱ्या वाईट घटना… अशा सगळ्या पार्श्वभूमीवर स्नेहसंगीत प्रतिज्ञा संस्थेच्या माध्यमातून गरजूंना गेल्या पंचवीस वर्षांपासून आर्थिक सहकार्य केले जाते आणि ते देखील फेस बुक लाईव्ह सांगीतिक मैफिलीतून… आणि या अशा मैफिली, हे असे प्रेरणादायी कार्यक्रम खऱ्या अर्थाने समाजातील विचित्र परिस्थितीतही मनाची मशागत करणारे ठरतात. या संस्थेच्या माध्यमातून आजवर तब्बल लाखांच्यावर मदत गरजवंताना दिली गेलेली आहे. एड्स ग्रस्त भगिनींसाठी कोल्हापुरातील दऱ्याच वडगाव येथे निवारा केंद्र उभारण्याच्या दृष्टीने स्नेहसंगीत प्रतिज्ञा ने पावलं उचलली आहेत. आतापर्यंत पाच लाखांचा निधी जमा झालेला आहे. यापूर्वी एका एड्स ग्रस्त भगिनीसाठी या मैफिलींच्या माध्यमातून घरही बांधून देण्यात आले आहे.

ना नफ्यासाठी ना स्वार्थासाठी आमची मैफिल गरजवंतांसाठी…

हे ब्रिद घेऊन हा अनोखा उपक्रम कोल्हापुरात सुरू आहे. ही संकल्पनाही इथलीच आणि ही इथेच वाढली आणि आता कित्येकांच्या मनात रुजली देखील आहे. २००० साली जेव्हा या संस्थेने कलेच्या माध्यमातून गरजूंची सेवा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यात प्रथम त्याग केला तो म्हणजे स्वार्थाचा… अहंकाराचा.. प्रसिद्धीचा… आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा. श्रेयमुक्त आणि ध्येयसक्त या मार्गावरून ही संस्था आपल्या कार्याचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी प्रशांतजी एकटेच मैफिली करायचे पण आता हळू हळू असंख्य सूर त्यांच्या सुरात मिसळले आणि हा सांगीतिक कट्टा फेस बुक लाईव्ह वरून सक्रियपणे कार्यरत झाला.

जिथे कमी तिथे आम्ही…

या उक्तीनुसार जेव्हा कुणी नसेल तेव्हा हा स्नेह संगीत प्रतिज्ञा च्या कार्याचा रथ अखंड सुरू ठेवतात. कार्याचा संकल्प आणि त्याची सिद्धी पर्यंतचा हा प्रवास आजअखेर निरंतर सुरू आहे. या मार्गातील वळणावर येणाऱ्या कित्येकांना आर्थिक सहकार्य मिळाले आहे, याची तर गाणनाच नाही. याच फाउंडेशन करून सरकारच अनुदान मिळवावं असा विचारही कधी प्रशांतजीना सुचला नाही. प्रत्येक गोष्टीत सरकारला दोष देत बसण्यापेक्षा यामध्ये मी काय देऊ शकतो याचा विचार त्यांनी केला आणि ते एकटे मार्गस्थ झाले. आणि रस्त्यात प्रत्येक वळणावर सम विचारी लोकांना ते एकत्र करत गेले. या सर्वांच्या सबळ साथीने तब्बल २५ वर्षांपासून न थकता या मैफिली रोजच्या रोज होत आहेत. यात कधीही खंड पडलेला नाही ही गोष्ट विशेष नोंद घेण्याजोगी आहे. नुकताच २ एप्रिलला गोविंदराव टेंबे रंगमंदिरात संस्थेने चॅरिटी शो केला.. आता २७ मे ला देखील शाहू स्मारक मध्ये संस्थेचा चॅरिटी शो होणार आहे. यातून जमा होणारा सगळा निधी हा गरजवंतांपर्यंत पोचतो… ही विश्वासार्हता या संस्थेने जपली आहे. या संस्थेच्या सहकार्याचा भाग आपणही होऊया.

————————————————————————–————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here