शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती; सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक संपन्न..

0
118
Google search engine

सातारा : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि शिक्षक-पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

युवकांना प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासह शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ मिळवून देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना अधिक मजबूत करणे, मतदारांशी प्रभावी संवाद साधणे आणि विविध स्तरांवर समन्वय राखून काम करणे, याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार निरंजन डावखरे, धैर्यशील कदम, प्रियाताई शिंदे तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या समस्या, त्यांच्या न्याय्य मागण्या आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिक्षकांच्या सेवा-सुरक्षेचे प्रश्न, शैक्षणिक धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आणि आवश्यक विशेष शिक्षकांच्या नियुक्त्या या मुद्द्यांवर प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

शिक्षकांचे प्रश्न केवळ मांडण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यावर ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यावर गावडे यांचा भर राहणार आहे. शिक्षक व पदवीधरांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विधायक भूमिका घेणे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत प्रभावीपणे पोहोचवून त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून संघटनात्मक तयारीला वेग देण्यात येत असून, शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन केले जात आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here