प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
युनायटेड स्टेट ने भारताला सुमारे १४ दशलक्ष डॉलर (अंदाजे १२० कोटी रुपये) किमतीच्या ६५७ दुर्मीळ आणि प्राचीन मूर्ती व कलाकृती परत केल्या आहेत. चोरी गेलेल्या सांस्कृतिक वारशाच्या पुनर्प्राप्तीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या सर्व मूर्ती आणि कलाकृती गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्यांमार्फत भारतातून परदेशात नेण्यात आल्या होत्या. अमेरिकेच्या मॅनहॅटन जिल्हा अटॉर्नी कार्यालयाने सखोल तपासानंतर या वस्तू जप्त करून भारताला परत करण्याचा निर्णय घेतला.
मॅनहॅटनचे जिल्हा अॅटर्नी अल्विन ब्रॅग (Alvin Bragg) यांनी २८ एप्रिल रोजी ही घोषणा केली. या तपासामध्ये बदनाम कला व्यापारी सुभाष कपूर आणि दोषी तस्कर नॅन्सी वीनर (Nancy Wiener) यांच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय रॅकेटचा समावेश होता.
न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या कौन्सिलर राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत हस्तांतरण सोहळा पार पडला. तसेच, भारताचे महावाणिज्य दूत विनया प्रधान यांनी मॅनहॅटन जिल्हा अॅटर्नी कार्यालय, यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (US Department of Homeland Security) आणि इतर यंत्रणांचे आभार मानले.
अल्विन ब्रॅग यांनी सांगितले की, “भारतीय सांस्कृतिक वारशावर लक्ष्य करणाऱ्या तस्करी नेटवर्कचे प्रमाण खूप मोठे आहे. आज ६०० हून अधिक वस्तू परत मिळाल्या असल्या तरी अजूनही अनेक वस्तू परत आणायच्या आहेत.”
दरम्यान, या प्रकरणात एक विशेष लक्षवेधी कलाकृती म्हणजे लाल वाळूच्या दगडातील भगवान बुद्धांची मूर्ती आहे. या मूर्तीत बुद्ध उजवा हात वर करून ‘अभयमुद्रा’ दर्शवत आहेत, जी संरक्षण आणि निर्भयतेचे प्रतीक मानली जाते. सुमारे ७.५ दशलक्ष डॉलर किमतीची ही मूर्ती तस्कर सुभाष कपूर याने बेकायदेशीररित्या न्यूयॉर्क सिटी येथे आणल्याचे उघड झाले.
तपास यंत्रणांनी ही मूर्ती जप्त केली असून, ती भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. अशा प्रकारच्या तस्करीमुळे ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला मोठा धोका निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या, या सर्व मूर्ती आणि कलाकृती भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू असून, आंतरराष्ट्रीय सहकार्याने भविष्यातही अशा चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत.






