प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
रोम/वॉशिंग्टन: २०२६ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून युद्धामुळे ईराण बाहेर पडल्यास, त्यांच्या जागी इटलीला संधी द्यावी, हा अमेरिकन विशेष दूत पाओलो झाम्पोली यांचा प्रस्ताव खुद्द इटलीच्याच मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे.

इटलीच्या क्रीडा मंत्र्यांनी हा प्रस्ताव ‘अयोग्य’ असल्याचे म्हटले असून, अर्थमंत्र्यांनी या कल्पनेचा ‘लज्जास्पद’ असा उल्लेख केला आहे.
नेमके प्रकरण काय?
अमेरिका आणि ईराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे ईराणचे विश्वचषकातील स्थान अनिश्चित असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत पाओलो झाम्पोली यांनी फिफा (FIFA) अध्यक्ष जियानी इन्फँटिनो आणि ट्रम्प यांना एक सुचवले होते की, ईराणच्या जागी इटलीला प्रवेश द्यावा. इटलीने चार वेळा विश्वचषक जिंकला आहे, त्यामुळे त्यांचा दावा प्रबळ असल्याचे झाम्पोली यांनी म्हटले होते.
इटलीचा स्वाभिमानी नकार
इटली सलग तिसऱ्यांदा विश्वचषक पात्रतेत अपयशी ठरला आहे. ३१ मार्च रोजी झालेल्या प्ले-ऑफ सामन्यात बोस्निया आणि हर्झगोव्हिनाने इटलीचा पराभव केला होता. या पराभवानंतर ‘मागील दाराने’ प्रवेश मिळवण्याची कल्पना इटलीला मान्य नाही.

क्रीडा मंत्री अँड्रिया अबोडी: “विश्वचषकासाठी मैदानात जिंकून पात्र व्हावे लागते. हा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे आणि नैतिकदृष्ट्या अयोग्यही.”!

अर्थमंत्री जियानकार्लो जिओर्गेट्टी: “हा प्रस्ताव अत्यंत लज्जास्पद आहे.”!
कॉनी (CONI) अध्यक्ष लुसियानो बुओनफिग्लिओ: “मला या प्रस्तावाचा अपमान वाटतोय. विश्वचषकात खेळण्यासाठी ती जागा कमावलेली असावी लागते.”!
ईराणची भूमिका:
दुसरीकडे, ईराण सरकारने स्पष्ट केले आहे की, ते २०२६ च्या विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार आहेत. ईराणने १५ जून रोजी लॉस एंजेलिसमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळण्याचे नियोजित आहे. जर ईराणने माघार घेतली, तर कोणाला संधी द्यायची याचे सर्व अधिकार फिफाच्या ‘अनुच्छेद ६.७’ नुसार फिफाकडेच राखीव असतील.






