प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
वॉशिंग्टन/पश्चिम आशिया : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तैनात अमेरिकन युद्धनौकांवरील सैनिकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. युनायटेड स्टेट्स नेव्ही च्या यूएसएस त्रिपोली आणि यूएसएस अब्राहम लिंकन या युद्धनौकांवरील कर्मचाऱ्यांनी कमी व निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत तक्रारी केल्या आहेत.
माध्यमांत समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये अत्यल्प प्रमाणात अन्न दिले जात असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी केवळ थोडेसे मांस, एक टॉर्टिला, उकडलेल्या गाजरांचे काही तुकडे आणि कोरडे मांस असे अपुरे जेवण दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सैनिकांमध्ये सतत भुकेची भावना निर्माण होत असून मनोबल खालावत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
एका नौसैनिकाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “अन्न चवहीन आहे आणि पुरेसेही नाही. ते सतत भुकेले असतात.” तर दुसऱ्या एका मरीन सैनिकाने कुटुंबाला पाठवलेल्या संदेशात “आम्ही जेव्हा शक्य असेल तेव्हाच खातो आणि अन्न समान वाटून घेतो,” असे म्हटले आहे.
दरम्यान, मदतीसाठी कुटुंबीयांकडून पाठवले जाणारे पार्सलही अडथळ्यात आले आहेत.युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस ने एप्रिलच्या सुरुवातीपासून पश्चिम आशियातील 27 लष्करी पिनकोडसाठी टपाल सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. हवाई क्षेत्र बंद असणे आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
टपाल सेवा बंद असल्याने हजारो केअर पॅकेजेस अडकून पडले असून ती कधी पोहोचतील याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. या परिस्थितीमुळे सैनिकांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली आहे.
सध्या यूएसएस त्रिपोली वर सुमारे 3,500 सैनिक तैनात असून ती जपानहून रवाना झाल्यानंतर महिनाभरापासून समुद्रात आहे. तसेच यूएसएस अब्राहम लिंकन दीर्घकाळापासून तैनात असल्याने पुरवठा व्यवस्थेवर ताण वाढल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात असून, अन्नपुरवठा आणि टपाल सेवा कधी पूर्ववत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






