Google search engine

प्रसारमाध्यम प्रतिनिधी

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांमधील तसेच झोनल स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वातावरणातील जल्लोष आणि अभिमान असा समृद्ध भावनांनी संपूर्ण कार्यक्रम मंत्रमुग्ध वातावरणात दिमाखदार ठरला . आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील तानिया उमेश काटिगर या विद्यार्थिनीचा यावेळी ‘ बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट ‘ पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी आणि इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्याहस्ते विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य भिर्डी यांनी ,“क्रीडा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवत नाही तर व्यक्तिमत्त्व घडवते, संघभावना वाढवते आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देते.खेळ तुम्हाला जिंकायला शिकवतातच, पण पराभवातून पुन्हा उभे राहण्याची ताकदही देतात.” असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रातील शिस्त, चिकाटी आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. पदवी अभ्यासक्रमामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाला तर पदविका अभ्यासक्रमामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागांना ‘जनरल चॅम्पियनशिप’ प्रदान करण्यात आली.
या स्पर्धांचे नियोजन आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी इन्स्टिट्यूटचे क्रीडाप्रमुख ऋषिकेश मेथे पाटील , क्रीडा समन्वयक प्रा. साजिद नाईक, प्रा. सुरज गायकवाड , प्रा.श्रद्धा मेस्त्री आणि प्रा. शिवानी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सराव करून उत्कृष्ट कामगिरी केली. रजिस्ट्रार अमित आवाड यांनी खेळाडूंसाठी प्रशिक्षणाची तसेच क्रीडा साहित्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिली.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करताना क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी संस्थेचे सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे सांगितले. उपस्थितांकडून सर्व खेळाडूंचे कौतुक करण्यात आले. हा सन्मान सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, आगामी काळात अधिकाधिक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here