प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात दारू पार्टीचा बेत आखला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दारू पिण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वैध परवाना बंधनकारक असून, परवाना नसताना मद्यप्राशन केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
देशी दारूची दुकाने, वाईन शॉपी, बीअर शॉपी, परमिटरूम तसेच बीअरबारमध्ये मद्यपान परवाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंदा थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर तब्बल १ लाख ९० हजार परवाने वितरित होणार आहेत.
२१ वर्षांवरील नागरिकांसाठी परवाना बंधनकारक
दारूच्या नशेत गैरप्रकार घडू नयेत, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमावली कडक केली आहे. २१ वर्षांवरील व्यक्तींनाच सशुल्क मद्यपान परवाना दिला जातो. विनापरवाना मद्यप्राशन करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
मद्यपान परवान्यांचे दर
कायमस्वरूपी परवाना : १,००० रुपये
एक वर्षाचा परवाना : १०० रुपये
एक दिवसाचा विदेशी दारू परवाना : ५ रुपये
एक दिवसाचा देशी दारू परवाना : २ रुपये
अटींचे पालन आवश्यक
परवाना घेतल्यानंतरही काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये, तसेच इतरांना त्रास होईल असे वर्तन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते.
गेल्या वर्षातील परवाना विक्री
गेल्या वर्षभरात सुमारे १ लाख ६८ हजार परवाने विक्री करण्यात आले असून, त्यातून १ लाख ३२ हजार रुपयांचा महसूल शासनाकडे जमा झाला आहे.
थर्टी फर्स्टसाठी कडेकोट बंदोबस्त
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सकाळपासून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून, वाहतूक शाखेकडून मद्यपी वाहनचालकांची कसून तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे.
अवैध दारूवर उत्पादन शुल्क विभागाची नजर
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नऊ विशेष पथके नेमून अवैध दारूची वाहतूक आणि विक्रीवर लक्ष ठेवले आहे.
“परवाना घेऊनच मद्यप्राशन करावे, अन्यथा कारवाई अटळ आहे,” असा इशारा
स्नेहलता नरवणे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी दिला आहे.
शहरात परवाने कुठे मिळणार?
यंदा ३१ डिसेंबरसाठी १ लाख २० हजार परवाने विक्रीसाठी उपलब्ध
१) देशी दारूची दुकाने, वाईन शॉपी, बीअर शॉपी, परमिटरूम, बीअरबारमध्ये परवाने उपलब्ध आहे.
२) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईटवरून ऑनलाइन परवाना घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मराठी भाषा निवड करून, इथे रजिस्टर करून उत्पादन शुल्क विभाग निवडून अर्ज भरू शकता व ऑनलाईन माहिती अपलोड करून पैसे भरू शकता.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
वरील वेब साईट वर रजिस्टर झाल्यावर तुम्ही या उत्पादन शुल्क विभागाच्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकता किंवा परवाना डाऊनलोड करु शकता.
https://exciseservices.mahaonline.gov.in/?MenuID=1243






