नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणाचा फेरविचार करा, असा सल्ला प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीतून केंद्र सरकारला दिला आहे. भारत सध्या अमेरिकेच्या टॅरिफ संकटाचा सामना करतोय. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी रघुराम राजन यांनी हा सल्ला दिला आहे.
अमेरिकेच्या या निर्णयाचा छोटे शेतकरी, कपडा उत्पादकांना फटका बसेल. यामुळे अनेकांचे रोजगार धोक्यात आले असून हे अस्वस्थ करणारं आहे असं मत रघुराम राजन यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मांडलं. सध्याच्या जागतिक स्थितीत व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक शक्तीचा शस्त्रासारखा वापर केला जात आहे. भारताने याचा काळजीपूर्वक सामना केला पाहिजे, असं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयावर अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांचा ५० टक्के टॅरिफचा निर्णय हा भारत-अमेरिका संबंधांसाठी झटका आहे. भारत सरकारसाठी हा जागं होण्याचा कॉल आहे असं रघुराम राजन यांना वाटतं. बुधवारपासून अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय सामानावर ५० टक्के टॅरिफ लागू झाला आहे. जगातील दोन मोठ्या लोकशाही आणि अलीकडच्या दशकात रणनितीक भागीदार बनलेल्या दोन्ही देशांच्या संबंधांसाठी हा एक धक्का आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून ट्रम्प यांनी दंडात्मक अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावलाय. त्याशिवाय आधीपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तुंवर २५ टक्के टॅरिफ आहेच.
हा वेक अप कॉल म्हणजे जागं होण्याचा कॉल आहे. कुठल्या एका देशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू नका. अमेरिकेसोबत पूर्वेकडच्या देशांकडे, युरोप, आफ्रिकेकडे बघा. ८ ते ८.५ टक्के विकास दर गाठण्यासाठी सुधारणा करा, त्यामुळे आपल्या युवा पिढीला रोजगार मिळू शकेल असं राजन म्हणाले. भारतातून वस्त्र, रत्न, दागिने, बूट-चप्पल, क्रीडा साहित्य, फर्निचर आणि केमिकल्सची मोठ्या प्रमाणात अमेरिकेत निर्यात होते. या उद्योगांना ट्रम्प यांच्या टॅरिफचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल.
ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे छोटे निर्यातदार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांना धोका आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो. भारताने रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणाचा सुद्धा फेरविचार करावा असा सल्ला रघुराम राजन यांनी दिला आहे. यामुळे कोणाला फायदा होतोय आणि कोणाचं नुकसान याचा विचार केला पाहिजे. शुद्धीकरण करणाऱ्यांना यातून बराच पैसा मिळतोय. पण निर्यातदारांना त्याची किंमत चुकवावी लागत आहे. फायदा मोठ्या प्रमाणात नसेल, तर खरेदीच्या धोरणाचा आपण फेरविचार केला पाहिजे असं रघुराम राजन म्हणाले.
————————————————————————————————-