अमोल शिंगे : प्रसारमाध्यम न्यूज
दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगरावरील श्रावण षष्ठी यात्रा उत्साहात संपन्न झाली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही यात्रा नियोजनबद्ध पार पडली. पण अन्न प्रशासन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे जोतिबा डोंगरावर निकृष्ट दर्जाचे आणि मुदतबाह्य पेढे विक्रीला आले होते. जोतिबा ग्रामपंचायतीने या पेढे विक्रेत्यांवर कारवाई करत तब्बल १५० किलो (६० हजार रुपये) किमतीचे पेढे जप्त करून ते नष्ट केले. या प्रक्रियेत अन्न प्रशासन विभाग पूर्णपणे अनभिज्ञ होता..
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील प्रसादाच्या पेढ्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. सन २०२४ च्या चैत्र यात्रेत तब्बल दोन टन भेसळयुक्त आणि मुदतबाह्य पेढा विकणाऱ्यांवर कारवाई करून तो नष्ट करण्यात आला होतं. २०२५ च्या सुरवातीला तर पेढ्यात चक्क ब्लेडचे पान आढळून आले आणि हा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. या दोन घटनानंतर जिल्हा प्रशासनातील अन्न प्रशासन विभागाने ‘लाव लिजाव टिमकी बजाव’ पद्धतीची कारवाई करून स्थानिक विक्रेत्यांवर नियमावली लादली मात्र प्रत्यक्षात उत्पादकांवर कारवाई झाल्याचे कधीच दिसून आले नाही. स्थानिक विक्रेत्यांवर लादलेली नियमावली नव्याचे नऊ दिवस सुरु राहिली आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ कार्यपद्धत सुरूच राहिली.

२०२४ मध्ये झालेल्या मोठ्या कारवाईनंतर पेढ्यांच्या पॅकिंगला मुदतबाह्य तारीख लावण्याचा नियम सुरु केला प्रत्यक्षात हे नियम पेढे उत्पादकांना लागू करणे गरजेचे होते. २०२५ या वर्षाच्या सुरवातीलाच जोतिबा डोंगरावरील एका दुकानात विक्रीला आलेल्या पेढ्यात ब्लेडचे पान सापडले होते. या गंभीर मुद्द्याची सर्वच प्रसारमाध्यमांनि दखल घेतली आणि हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला पण यात कोणावरही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. किंबहुना संबंधित उत्पादकांना आणि घाऊक व्यापाऱ्यांना अन्न प्रशासन विभागाने जिल्हा प्रशासनाच्या नियोजन बैठकीला देखील बोलावले नाही. याचा ‘अर्थ” काय? अशी चर्चा ग्रामस्थांमधून आणि भाविकांमधून सुरु झाली.

नुकत्याच पार पडलेल्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेदिवशी काही ग्रामस्थांनी असे भेसळयुक्त आणि अन्न प्रशासनाचा परवाना नसलेले पेढे विक्रेत्यांना पकडून दिले होते यावेळी देखील अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी भर यात्रेतून बेपत्ता आणि नॉट रिचेबल होते. या पेढ्यांवर कारवाई करायची कोणी? या तांत्रिक अडचणीत दोन दिवस कारवाईत जप्त केलेले पेढे ग्रामपंचायत कार्यालयात पडून होते. काल झालेल्या श्रावण षष्ठी यात्रेत सुद्धा भेसळयुक्त आणि मुदतबाह्य झालेले पेढे सर्रास विक्रीला होते. सामाजिक कार्यकर्ते सुनिल नवाळे आणि ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगम यांनी या विक्रेत्यांना शोधून काढून त्यांच्याकडून तब्बल १५०किलो आणि ६० हजार रुपये किमतींचे पेढे जप्त केले. यावेळी सुद्धा अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी गैरहजर होते. पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अन्न प्रशासन विभागाने कारवाई करून हे पेढे नष्ट केले.
श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर हे संपूर्ण महाराष्ट्राबरोबर कर्नाटकाचे सुद्धा कुलदैवत आहे. वर्षाकाठी सुमारे दीड कोटी भाविक जोतिबा डोंगरावर जोतिबाच्या दर्शनासाठी येत असतात. हेच भाविक जोतिबाचा प्रसाद म्हणून मोठ्या भावनेने पेढा प्रमाणात खरेदी करत असतात. जर हाच भेसळयुक्त प्रसाद भाविकांना मिळत असेल तर अन्न प्रशासन विभाग भाविकांच्या भावनेशी खेळत आहे. एकूण परिस्थिती पहाता जोतिबा डोंगरावर भाविकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू पाहणाऱ्या भेसळयुक्त आणि मुदतबाह्य पेढ्यांच्या संवेदनशील विषयाबाबत अन्न प्रशासन विभाग असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे.