पन्हाळा प्रतिनिधी: मे महिन्यात पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घेण्याचा अंतिम निर्णय होणार आहे. पन्हाळकरांनी या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे त्यांच्या दालनात पन्हाळकरांची मतं जाणून घेण्यासाठी दिनांक २३ एप्रिल रोजी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीवर पन्हाळकरांनी बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात आज पन्हाळा गडावर प्रांताधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात पन्हाळकर बैठकीला का येऊ शकत नाहीत याची काही कारणं दिली आहेत.
पन्हाळ्यावरील १३ डी लघुपट लोकार्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वी जागतिक वारसा समितीने पन्हाळा गडाची पाहणी देखील केली होती मात्र या प्रक्रियेत पन्हाळकरांनां विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेल्याचा आरोप पन्हाळकरांनी करून या प्रक्रियेला कडाडून विरोध केला होता. हा विरोध लक्षात घेऊन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिनांक २२ एप्रिल रोजी त्यांच्या दालनात पन्हाळकरांची मतं जाणून घेण्यासाठी दिनांक २३ एप्रिल रोजी एक बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीवर पन्हाळा गडवासियांनी काही कारणं देत बहिष्कार टाकला आहे. पन्हाळा गडावरील साडे तीन हजार लोकसंख्या आहे. एवढे लोक घेऊन कोल्हापूरला चर्चेला येणे शक्य नाही, एवढ्या लोकांना कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी एवढी वाहने उपलब्ध नाहीत, पन्हाळा येथी नागरिकांमध्ये महिलांचे आणि त्यांच्या लहान मुलांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात सोय होणार नाही तसेच जेष्ठ नागरिकांना या कडाक्याच्या उन्हात कोल्हापूर पर्यंत प्रवास करणे शक्य होणार नाही अशी काही कारणं देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पन्हाळा गडावरच बैठक घ्यावी, असे एक निवेदन आज पन्हाळा गडावरील सर्व पक्षीय नेत्यांनी, व्यापारी वर्गाने आणि नागरिकांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना दिले आहे.





