पन्हाळा प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेची सांगता म्हणून भाविकांसाठी जोतिबा डोंगरावरील सर्वच स्तरातील ग्रामस्थांकडून गाव भंडाऱ्याचे नियोजन करण्यात येते. हा गाव भंडारा जोतिबा डोंगराच्या सामाजिक एकतेचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी जोतिबा चैत्र यात्रेची सांगता म्हणून या गाव भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे आणि कर्नाटकचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची सांगता म्हणून प्रत्येक वर्षी जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थांच्यावतीने गाव भंडारा आयोजित करण्यात येतो. हा गावाभंडारा जोतिबा डोंगराच्या एकतेचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. या गावभंडाऱ्याचा आयोजक जरी गुरव समाज असला तरी जोतिबा डोंगरावरील सर्व जाती धर्माच्या लोकांचं यासाठी मोलाचं सहकार्य असतं. अगदी धान्य देण्यापासून ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यापर्यंत जोतिबा डोंगरावरील सर्वच जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. या गावभंडाऱ्यातील गव्हाच्या खिरीची आणि बटाट्याच्या भाजीच्या चवीची चर्चा तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. ही खिर आणि भाजी बनवण्याची विशिष्ट पद्धत या पदार्थांना रुचकर बनवते. या गावभंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी जोतिबा डोंगराच्या पंचक्रोशीतील भाविकांबरोबर आता कोल्हापूर, सातारा, सांगली आदी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या गावभंडाऱ्या दिवशी या प्रसादाच्या नैवध्याची शोभा यात्रेच्या स्वरूपात मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत गावातील सर्व सासनकाठ्या सहभागी होत असतात. यानंतर प्रसाद वाटपास सुरवात होते. यादिवशी जोतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. डवरी गीतांचा कार्यक्रम, भजन कीर्तन हे कार्यक्रम सुद्धा रात्रभर मंदिरात सुरु असतात. मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी हा गावाभंडारा होणार आहे. जास्ती जास्त भाविकांनी या गावभंडाऱ्यातील प्रसादाचा लाभ घ्यावा, असे जोतिबा डोंगरावरील समस्त गुरव समाजाने भाविकांना आवाहन केले आहे.