जागतिक वारसा स्थळा संदर्भातील बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे.
पन्हाळा : प्रसारमाध्यम प्रतिनिधी
जागतिक वारसा स्थळांची कोणती ही वेगळी नियमावली नसून पुरातत्व खात्याच्या नियमावलीचे पालन करून आणि पन्हाळावासियांना विश्वासात घेवूनच पन्हाळा जागतिक वारसा स्थळात जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळावासियांना दिले. जागतिक वारसा स्थळात पन्हाळा गडावरुन होत असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने नागरिकांच्या असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पन्हाळा नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून ४.३० पर्यंत म्हणजे सुमारे अडीच तास पन्हाळा येथे नागरिकांशी संवाद साधला होता. मयुर बागेतील नगरपरिषदेच्या सभागृहार पार पडलेल्या बैठकीसाठी सुमारे एक हजार नागरीक हाजर होते. काही पन्हाळा नागरिकांनी नगरपरिषदेकडे लिखित प्रश्न दिले होते. तरीही सुरवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रश्न विचारण्याची परवानगी दिल्याने पन्हाळा नागरिकांनी उस्फुर्तपणे आपले प्रश्न विचारले.
नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नात प्रामुख्याने पाणी पुरवठ्याची टाकी काढणार का ? त्याबाबत कोणते धोरण असणार ? रीतसर परवानगीने उभारलेले मोबाईल व बी. एस. एन. एल. टॉवर का काढणार ? पन्हाळ्यावरील शासकीय कार्यालये हलवणार का ? १०० मीटर मधील घरे काढणार का ? व्यावसाईकांचे व्यवसाय आहे त्या ठिकाणावरून बंद करावे लागणार का ? त्यांची व्यवस्था कोठे करणार ? पन्हाळा जागतिक वारसा स्थळात समाविष्ठ झाल्याने नेमके कोणते बदल होणार ?पुरात्त्वच्या नियमात बदल होऊन नव्याने जाचक अटी येणार का ? हे प्रश्न विचारले. पन्हाळ्यातील व्यावसायिकांचे पुर्नवसन व्हावे.आता असलेल्या व्यतिरिक्त नवीन जाचक अटी लादू नयेत अशी मागणी केली.
यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी जागतिक वारसा स्थळामुळे पन्हाळगडावर आज रोजी लागू असलेल्या पुरात्त्वच्या नियमात बदल होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत येथील वस्ती व शासकीय कार्यालये हलवली जाणार नाहीत. गडावर आज रोजी अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक इमारती नागरिकांच्या सहकार्या मुळेच सुस्थितीत आहेत. तसेच ऐतिहासिक इमारती जवळील व्यवसाय हे नियमात बसत नाहीत त्यामुळे त्यांची पर्यायी व्यवस्था केली जाईल.
पन्हाळ्याच्या भेटी वेळी जागतिक वारसा सल्लागार सदस्याने नोंदवलेल्या चार निरीक्षणा नुसार आम्ही मोबाईल व बी एस एन एल टॉवर बाबत पर्याय शोधात आहोत. तर पाण्याच्या टाकी हलवण्याबाबत आम्ही वेळ मागून घेतला असून ती न सकारात्मक पर्याय शोधत आहोत. त्यामुळे नागरिकांना विश्वासात न घेता गडावर कोणताही बदल केला जाणार नाही. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पुरातत्व संरक्षण सहाय्यक बाबासाहेब जंगले, तहसिलदार माधवी शिंदे-जाधव, मुख्यधिकारी चेतनकुमार माळी, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, दीपा काशीद, चंद्रकांत गवंडी, अँड. रविंद्र तोरसे, अँड. मिलिंद कुराडे, अँड. विशाल दुबुले, अँड.एम डी भोसले, अँड. तेजस्विनी गुरव, संभाजी गायकवाड, शरद शेडगे, आनंद जगताप, भिमराव काशीद, अभिजित फणसळकर, प्रकाश गवंडी, महेश कुराडे, महेश जगदाळे, चैतन्य भोसले, सुनिल हावळ आणि नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
————————————————————————————



