शाहुवाडी प्रतिनिधी
शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे दिवंगत आमदार संजयदादा गायकवाड यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या क्रिडा संकुलनाचे काम अद्यापही रेंगाळले असल्याचे दिसत आहे. शाहुवाडी तालुक्यातील क्रीडा परंपरेला चालना देण्यासाठी दिवंगत आमदार संजयदादा गायकवाड यांचे प्रयत्न शासकीय आणि राजकीय या दोन्ही स्तरावरील उदासीनतेमुळे मागे पडताना दिसत आहेत.
बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणासमोर बांबवडे ग्रामपंचायतीने गट नंबर ९३ मधील तब्बल ४ एकर जमीन क्रिडा संकुलनासाठी उपलब्ध करून दिली आहे. बांबवडे शहर हे तालुक्याच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने सुमारे ३८ खेडेगावांचा बांबवडे बाजारपेठेशी संपर्क येतो. या अनुषंगाने येथील तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षण करून सैन्यदल ,पोलीस व इतर स्पर्धा परीक्षेत संधी मिळावी यासाठी दिवंगत आमदार संजयदादा गायकवाड यांनी क्रिडा संकुलनाची मंजुरी मिळवली. मात्र त्यांच्या पश्चात हे काम रखडले काही कालावधीनंतर माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड व माजी आमदार सत्यजित पाटील यांनी पाठपुरावा करून क्रिडा संकुलाचे भुमिपूजन केले. मात्र लाखो रुपये खर्च करूनही या क्रिडा संकुलनाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येथील तरुणांना भरती पूर्व प्रशिक्षणचा सराव हा रस्त्यावरच करावा लागत आहे. यासाठी लोकप्रतिनिधी बरोबर प्रशासनाने या अपूर्ण असलेल्या क्रिडा संकुलनाचे काम त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील तरुण वर्गातून होत आहे .
“गेली २५ वर्षे बांबवडे येथील क्रिडा संकुलनाचा प्रश्न ऐरणीवर आहे . काम पूर्ण करण्यासाठी आमदार विनय कोरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असून परिसरातील तरुणांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे” — सुरेश नारकर, उपसरपंच ग्रामपंचायत बांबवडे .