कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. राज्यातील दोन हजारांहून अधिक महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून, तब्बल ३ कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार कुटुंबातील महिलांना मासिक ₹ १५०० चा आर्थिक आधार देते. हा निधी गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपात्र गटातील महिलांसाठी आहे. मात्र, अनेक शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी स्वत:ला अपात्र असतानाही पात्र म्हणून दर्शवले, योजनेत नोंदणी केली आणि ९ महिन्यांसाठी दरमहा ₹ १५०० प्रमाणे, एकूण ₹ १३,५०० ची रक्कम घेतली.
या प्रकारामुळे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचा अपहार झाल्याचे संकेत असून, हा निधी प्रत्यक्ष गरजू महिलांपर्यंत पोहोचू शकला नाही, हे अधिक चिंतेचे कारण आहे. काही प्रकरणांमध्ये योजनेची रक्कम एकाच खात्यातून अनेक वेळा काढल्याचेही आढळले आहे.
गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही गेल्या जुलै महिन्यात सुरू केली होती. त्याद्वारे लाभार्थी महिलाना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात. मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये काम करून ६ व्या व ७ व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, तसेच गलेलठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटलेली नाही. अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांच्या मोहापायी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि या योजनेचे दीड हजार रुपये मिळवण्याचा हावरटपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
अनेकाकंडून शासकीय योजनांचा गैरफायदा घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाल तब्बल १.५० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा युआयडी ( Unique Identification Data) उपलब्ध करून देण्यात आला आणि त्याची पडताळणी करण्यात आली. सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवण्यात आली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, हे चेक करण्यात आले असता २६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे गेले, असे उघड झाले.
९ महिन्यांत प्रत्येकी लाटले १३ हजार ५०० रुपये –
गेल्या वर्षी, म्हणजेच ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ म्हणजेच एकूण ९ महिन्याचे मिळून १३ हजार ५०० रुपये त्या महिलांनी लाटले. एकूण हा आकडा ३ कोटींपेक्षा जास्त होत आहे. लाडकी बहीण योजना ही गरीब, महिलांसाठी असून सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार नसल्याचे, आधीच नियमांत स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र तरीही सरकारी कर्मचारी महिलांचा पैशांचा मोह काही सुटला नाही आणि त्यांनी या योजनेसाठी अर्ज भरत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांवर डल्ला मारलाय. हे प्रकरण उघडकीस आल्यावर खळबळ माजली असून आता आणखी ६ लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी केली जाणार असल्याचे समजते.
लाखो महिलांकडून दोन योजनांचा लाभ –
एवढंच नव्हे तर ८ लाखांहून अधिक महिलांनी दोन सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ लाख ८५ हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलला आहे. सरकारी कर्मचारी म्हणून गलेलठ्ठ पगार मिळत असूनही त्यांनी दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये लाटलेच पण त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी ६ हजार, ( म्हणजेच एकूण १२ हजार) रुपयेही त्यांनी घेतल्याच समोर आले आहे.
लाडक्या बहिणी बनत आता ज्या २ हजार ६५२ महिलांनी दर महिन्याचे १५०० रुपये लाटले आहेत, त्यांच्या एकूण ३ कोटी ५८ लाख रुपयांची शासनाकडून वसुली करण्यात येणार असल्याचे समजते.
————————————————————————————–