पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा आणि शेलारवाडी या दोन गावांना जोडणारा पूल रविवारी दुपारी कोसळला आणि यावेळी झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटक दगावले, तर ५० पेक्षा अधिक पर्यटक जखमी झालेले आहेत. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. असे अपघात वारंवार होऊन देखील आपण यातून बोध का घेत नाही? हा प्रश्न उपस्थित होतो.
हा पूल सुमारे ३२ वर्षे जुना होता आणि त्याचे दुरुस्तीचे काम गरजेचे होते. त्यासाठी शासनाचा प्रस्ताव मंजूर होऊन अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद देखील करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याची माहिती मिळाली. अशा स्थितीत त्या जीर्ण झालेल्या पुलावर एकाच वेळी १०० पेक्षा अधिक पर्यटक उभे तर झालेच पण त्याचबरोबर काही उत्साही पर्यटकांनी आपल्या मोटरसायकल्स देखील पुलावर घातल्या त्यामुळेच हा जीर्ण पूल अचानक कोसळला आणि त्यात ही दुर्घटना घडली असे जाणकारांचे मत आहे.
वस्तुतः हा पूल जीर्ण झाला आहे आणि ही बाब लक्षात घेता या पुलाचा वापर करू नये अशा सूचना स्थानिक प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूला लावल्या होत्या. या सूचना मराठी भाषेतच होत्या. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार तिथे आलेल्या पर्यटकांना उपस्थित पोलिसांनी पुलावर गर्दी करू नका असेही सांगितले होते. मात्र स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत पर्यटक पुलावर गर्दी करून सेल्फी काढत उभे राहिले. इतकेच नव्हे तर काही उत्साही पर्यटकांनी पोलिसांच्या आणि स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत मोटरसायकली देखील चालवत नेल्या. एकंदरीत पर्यटकांनीच स्वतःहून हे गंडांतर ओढवून घेतले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
तसा विचार केल्यास जेव्हा पुलाच्या दोन्ही बाजूला सूचनाफलक लावलेले आहेत, आणि ते स्थानिक भाषेत लावलेले आहेत. म्हणजेच प्रत्येकाला ते वाचता येतात असे गृहीत धरायला हवे. आजच्या २१ व्या शतकात ग्रामीण माणूस देखील तितपत सुशिक्षित नव्हे साक्षर तरी आहेच. स्थानिक नागरिक देखील पर्यटकांना सूचना देत होते. पोलिसांनी देखील विरोध केल्याचे काही वृत्तपत्रात आले आहे. अशावेळी पर्यटकांनी तरी हे नियम का मोडावे आणि स्वतःवर असे संकट का ओढवून घ्यावे हा देखील प्रश्न निर्माण होतोच. त्यासाठी खरे म्हटले तर स्वयंशिस्तच गरजेची असते. जेव्हा प्रशासनाने सूचना फलक लावला आहे की पूल नादुरुस्त आहे. त्यावेळी तिथून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाने काळजीपूर्वकच जायला हवे. त्याचबरोबर त्या पुलावर एका वेळी जास्त नागरिकांनी गर्दी करू नये, हे भान देखील पाळायला हवे मात्र आम्हाला कायदे पाळायचेच नसतात. त्यामुळेच मग असे प्रकार घडतात.
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सामाजिक विचारवंत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी नेहमी म्हणायचे की, “आपल्या देशात आम्ही कायदा किती पाळतो यापेक्षा आम्ही कायदा किती मोडू शकतो यावर आमची सामाजिक प्रतिष्ठा ठरवली जाते, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल”. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते एक उदाहरणही द्यायचे. त्या काळात महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी सायकलला लाईट लावून जाणे गरजेचे असे. तुमच्या सायकलला लाईट नसला तर तुमच्यावर पोलिसी कारवाई होत असे. त्या काळात आपल्या मुद्द्याचा दाखला देताना न्यायमूर्ती म्हणायचे की, “कोणी मला विचारले की तुझी प्रतिष्ठा काय तर मी सांगायचो की नागपुरात रात्रीच्या वेळी सायकलला दिवा न लावता मी नागपूरभर फिरलो तरी मला कोणीही पोलीस पकडणार नाही. म्हणजेच मी कायदा किती मोडू शकतो त्यावर माझी सामाजिक प्रतिष्ठा ठरते”.
न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी व्यक्त केलेली खंत आजही लागू आहे. आज देखील आम्हाला कोणताही कायदा असो किंवा सामाजिक, धार्मिक नियम अथवा प्रथा परंपरा, आम्ही त्या किती मोडतो आणि कशा मोडतो यावरच आम्ही स्वतःला प्रतिष्ठित समजत असतो. या घटनेत पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून त्या पुलावर गर्दी केली नसती आणि उत्साही दुचाकीस्वारांनी आपल्या मोटरसायकली घातल्या नसत्या, तर हा अपघात टळू शकला असता. मात्र पर्यटकांचा उत्साह आणि कायद्याला न जुमानण्याची त्यांची प्रवृत्ती यामुळेच हा अपघात घडला आहे हे नक्की.
आम्ही आज फक्त इथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी कायदा किंवा नियम कसा मोडता येईल तेच बघत असतो. रस्त्याने वाहतूक करताना देखील काही कायदे काही नियम लागू केलेले आहेत. वाहन आपण रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालवायला हवे. मात्र आमच्यापैकी अनेक जण हा कायदा अगदी सहजगत्या मोडत असतात. तिथे एखाद्याने रॉंग साईड का येतोस म्हणून हटकले तर तुला काय करायचे, असा प्रति प्रश्न करून विचारणाऱ्याशीच हे कायदेभंग करणारे भांडायला उतरतात. त्याचप्रमाणे चौकातला सिग्नल तोडून भरधाव गाडी काढण्यातही आम्हाला भूषण वाटत असते. तोच प्रकार रेल्वेचे रूळ ओलांडू नये असा नियम असतानाही आम्ही समोरून गाडी येत असताना देखील निर्धास्तपणे धावत पळत रुळावरून जातो. अशावेळी तिथे असणारा पूल वापरायला आम्हाला का कमीपणा वाटतो हे कधीच कळत नाही.
चौकातून सिग्नल तोडून गाडी काढताना किंवा रॉंग साईड गाडी चालवताना देखील आम्हाला कोणता मोठेपणा वाटतो हे कळत नाही. हे उदाहरणादाखल एक दोन प्रकार सांगितलेत. असे अनेक प्रकार आमच्यापैकी अनेक लोक करतात आणि कायदा किंवा नियम धाब्यावर बसवत असतात. अशावेळी जर अपघात झाले तर आम्ही प्रशासनालाच जबाबदार धरतो. या प्रकारात देखील तेच नेमके घडते आहे. विरोधी पक्षातील नेते सरकारला धारेवर धरत आहेत. पूल दुरुस्त का केला नाही, पुलावरून लोकांना जाणे येणे बंद का केले नाही, पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षारक्षक का ठेवले नाहीत, असे अनेक प्रश्न राजकीय नेते आज सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत. मात्र जनसामान्यांनी दोन्ही बाजूला लिहिलेली सूचना वाचून त्याप्रमाणे वर्तन केले तर असे अपघात होणारच नाहीत. असे असले तरी आम्ही त्यांना शहाणपण सांगायला जाणार नाही. कारण ते आमचे मतदार आहेत.
असे किती दिवस चालणार? यावर उपाय एकच आहे. आम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वयंशिस्त बाणवायलाच हवी. जेव्हा एखादी सूचना लिहिली आहे, तेव्हा तिचे पालन व्हायलाच हवे. ती जशी सूचना देणाऱ्याची जबाबदारी आहे तशीच एक जबाबदार नागरिक म्हणून आमची देखील जबाबदारी आहे. रस्त्याच्या चौकात पोलीस असो किंवा नसो रॉंग साईड वाहन आम्ही चालवायलाच नको. सिग्नल वर आम्ही थांबायलाच हवे. रेल्वे रूळ ओलांडणे टाळून पुलाचा वापर करायला हवा. सर्व नियम, कायदे, कानून आम्ही स्वतःहून पाळायलाच हवेत. तसे झाले तर आमच्या सर्वांचेच आयुष्य अधिक सुकर होईल आणि असे अपघात होणे कमी होईल, कदाचित टळू देखील शकेल. त्यासाठी आम्ही सर्वांनीच शहाणे व्हायला हवे ही आजची गरज आहे.
लेखक : अविनाश पाठक, नागपूर