मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या राज्यातील एकूण पाणीसाठा ८२.२० टक्क्यांवर पोहोचला असून, तो गेल्या वर्षी याच दिवशी ७०.२३ टक्के इतकाच होता. म्हणजे यंदा पाणीसाठा तब्बल १२ टक्क्यांनी जास्त आहे.
सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात ९१.४५ टक्के नोंदवला गेला असून, त्याखालोखाल पुणे विभागात ८९.६५ टक्के, अमरावती विभागात ८०.६२ टक्के आणि नाशिक विभागात ७४.०४ टक्के साठा आहे. नागपूर विभागात ७२.२७ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागात ७५.६९ टक्के पाणी साठले आहे.
यातील विशेष बाब म्हणजे नेहमीच दुष्काळग्रस्त ठरणाऱ्या मराठवाड्यात (छत्रपती संभाजीनगर विभाग) यंदा ७५ टक्क्यांहून अधिक पाणी साठले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या विभागात फक्त ३०.६४ टक्के पाणी उपलब्ध होते. म्हणजे तब्बल ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, राज्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे धरणांतील साठा कमी होऊ लागला होता. त्यातच उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने झाली. मात्र, एक महिन्यानंतर आलेल्या दमदार पावसामुळे धरणांचा साठा झपाट्याने वाढला.
राज्यातील सर्व विभागांतील मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८९ टक्के पाणी जमा झाले असून, गेल्या वर्षी याच वेळी हा साठा ७७.५२ टक्के होता. विशेष म्हणजे, राज्यातील २० मोठ्या प्रकल्पांमध्ये यंदा १०० टक्के पाणी साठले आहे.
विभागनिहाय पाणीसाठा (आज वि. गेल्या वर्षी ) :
-
नागपूर : ७२.२७ % (मागील वर्षी ८०.९१ %)
-
अमरावती : ८०.६२ % (मागील वर्षी ६६.४५ %)
-
छत्रपती संभाजीनगर : ७५.६९ % (मागील वर्षी ३०.६४ %)
-
नाशिक : ७४.०४ % (मागील वर्षी ६४.६१ %)
-
पुणे : ८९.६५ % (मागील वर्षी ८४.०१ %)
-
कोकण : ९१.४५ % (मागील वर्षी ९०.७४ %)
-
राज्याचा एकूण : ८२.२० % (मागील वर्षी ७०.२३ %)