नंदवाळ : प्रसारमाध्यम न्यूज
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नंदवाळ येथे ‘वारी स्वच्छतेची, वारी आरोग्याची’ या विशेष उपक्रमांतर्गत मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी या मोहिमेचे उद्घाटन वारणा उद्योग समूहाचे सहाय्यक विक्री व्यवस्थापक राजाराम देसाई, विक्री अधिकारी उत्तम पाटील, अवनि च्या वनिता कांबळे व प्रसारमाध्यम समूहाचे संचालक प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत कचरा वेचक महिलांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अवनि संस्थेच्या वनिता कांबळे म्हणाल्या, संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. यावर्षी आमच्या कामाला वारणा उद्योग समूह व प्रसारमाध्यम यांचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे. यामुळे आमच्या सामाजिक मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे. आमच्या महिला सकाळपासून नंदवाळ गावाच्या फाट्यापासून मंदिर परिसरा पर्यंत कचरा, प्लॅस्टिक संकलित करीत आहेत तसेच आमच्याकडून जागोजागी प्लॅस्टिक व कचरा एकत्रित करण्यासाठी कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. अशी मोहीम आम्ही धार्मिक स्थळांवरील स्वच्छतेसाठी नेहमी राबवत राहू.
वारणा उद्योग समूहाचे राजाराम देसाई म्हणाले, वारणा समूहाचे नेहमी चांगल्या कामासाठी सहकार्य असते. धार्मिक स्थळांवरील विशेषतः तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्लॅस्टिक कचरा संकलन मोहीमेला आमचे पाठबळ राहिले आहे. यावर्षी प्रसारमाध्यमसह आमच्या अवनि बरोबरचा प्रवास वारी स्वच्छतेची, वारी आरोग्याची निरोगी राहिली आहे.
अवनि संस्थेचे पन्नास स्वच्छतादूत सक्रियपणे सहभागी झाले होते. नंदवाळ फाट्यापासून मंदिर परिसर, यात्रास्थळ आणि गावातील मुख्य रस्ते या ठिकाणी पसरलेला प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. यासाठी हातमोजे, पिशव्या, झाडू आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते.
वारणा दूध प्रक्रिया उद्योग समूह, ‘अवनि’ सामाजिक संस्था आणि प्रसारमाध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेमुळे यात्रेनंतर परिसरातील मोठ्या प्रमाणावर साचणारा कचरा कमी करण्यात यश आले. विशेषत: प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांना प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी फलक, पोस्टर लावण्यात आले तसेच स्वयंसेवकांनी आवाहन केले.

स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व स्वच्छतादूतांचे आणि ग्रामस्थांचे कौतुक करत स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. या उपक्रमामुळे नंदवाळ गाव परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा संदेश सर्वत्र गेला. भाविक आणि ग्रामस्थांनी मिळून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्यामुळे आद्य पंढरपूर नंदवाळने स्वच्छतेच्या बाबतीत एक नवा आदर्श घालून दिला आहे.
——————————————————————————————-





