राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा ‘विजयी मेळावा’

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची शक्यता !

0
119
Google search engine

मुंबई : विशेष प्रतिनिधी

आज वरळी येथील डोम येथे पार पडलेल्या भव्य विजयी मेळाव्यात राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची चर्चा सुरु झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन भाऊ अनेक वर्षांच्या राजकीय अंतरानंतर एका मंचावर दिसले.

सध्या राज्यात मुंबई महापालिका (BMC) तसेच ठाणे, नाशिक, पुणे आदी महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण आहे. अशावेळी ठाकरे बंधू जर राजकीय पातळीवर एकत्र आले, तर त्याचा राज्याच्या सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम होणार, हे स्पष्ट आहे.
या मेळाव्यातून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या सारख्या शहरी भागात मराठी मतांची एकजूट होऊ शकते याची झलक पहायला मिळाली. तसेच मराठी मतदार पुन्हा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवू शकतात. आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला मोठं आव्हान निर्माण होऊ शकते याचा अंदाज आला. संपूर्ण राज्यात मराठी मतांच्या ध्रुवीकरणाची प्रक्रिया मंदावू शकते. हे यातून सिध्द झाले.

राज आणि उद्धव ठाकरे दोघेही मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यावर ठाम आहेत. मागील काही निवडणुकांमध्ये मराठी मतं विभागली गेल्याने भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला मोठा फायदा झाला. 

ठाकरे गटासाठी ‘मोठं कमबॅक’
गेल्या काही वर्षांत शिवसेना (ठाकरे गट) विविध राजकीय संघर्षात सापडला होता. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला पडल्याच्या आरोपांनी ठाकरे गटाला अडचणीत आणलं होतं. अशावेळी राज ठाकरे यांच्यासारख्या आक्रमक हिंदुत्ववादी नेत्यासोबत युती केल्याने गटाला बळ मिळू शकते. बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ विचार पुन्हा केंद्रस्थानी येईल. तसेच मुंबई, कोकणसह शहरी भागात ठाकरे गट पुन्हा सशक्त होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीवर ताण
राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली, तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या नव्या समीकरणाचा विचार करावा लागेल.
  • राज ठाकरे यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही नेते अस्वस्थ होऊ शकतात.
  • उद्धव ठाकरे जर मनसेसोबत स्वतंत्र युती करत महाविकास आघाडीतून बाहेर पडले, तर आघाडीची एकजूट खचू शकते.
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मग स्वतंत्र रणनीती आखावी लागेल.
भाजप-शिंदे गटाची डोकेदुखी
ठाकरे बंधू एकत्र आल्यास सर्वात मोठा धक्का भाजप आणि शिंदे गटाला बसू शकतो. गेल्या काही वर्षांत मराठी मतांचं ध्रुवीकरण करून भाजप आणि शिंदे गटाने शहरी भागात आपली ताकद वाढवली होती. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदे गटाची ताकद कोकण, मुंबईत कमी होईल. अशावेळी भाजपला नव्या रणनीतीचा विचार करावा लागेल. तसेच आगामी महापालिका निवडणुकांत भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहील.
मनसेला सावरण्याची मोठी संधी
सध्या मनसेची संघटनात्मक घडी विस्कटलेली आहे. पक्षाचा प्रभाव मुंबई आणि ठाण्यापुरता मर्यादित राहिला आहे. मात्र ठाकरे गटासोबत युती झाल्यास मनसेला पुन्हा राजकीय बळ मिळू शकतं. तसेच राज ठाकरे यांचा प्रभाव वाढू शकतो. त्याच बरोबर संघटनात्मक ताकद आणि मतदारांचा आधार वाढण्याची शक्यता आहे.

तथापी, दोन्ही नेत्यांच्या भूमिकांमध्ये तफावत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचे आरोप होत असताना, राज ठाकरे आक्रमक हिंदुत्ववादी विचारसरणी मांडतात. त्यामुळे या वैचारिक फरकांचा समन्वय साधणं कठीण ठरेल. युती टिकवण्यासाठी दोन्ही नेत्यांना लवचिकता आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल.अन्यथा युती फसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात राजकीय युती होणार की नाही, यावर अद्याप स्पष्टता नाही. मात्र, या एकतेच्या संकेतांनी राज्याच्या सत्तासमीकरणांना कलाटणी मिळू शकते, हे निश्चित. आता सर्वांचं लक्ष ठाकरे बंधूंच्या पुढील निर्णयांकडे आहे. युतीची औपचारिक घोषणा झाली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युगाची सुरुवात होईल, अशीच सध्या चर्चा रंगली आहे.

——————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here