नवी दिल्ली : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, आता ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणं अधिक सुलभ होणार आहे. यासाठी खास ‘वय वंदना कार्ड’ सुरू करण्यात आलं असून, हे कार्ड थेट मोबाइल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत मेडिक्लेम अर्जदारांना सहज उपलब्ध होणार आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंबंधी अधिसूचना जारी केली असून, देशभरातील करोडो वयोवृद्धांना याचा थेट लाभ होणार आहे. सरकारने जाहीर केलं की, हे कार्ड मिळवण्यासाठी कोणतीही कार्यालयीन पायपीट करण्याची गरज नाही, तर फक्त मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
अॅपवर अर्जाची प्रक्रिया –
-
‘आयुष्मान भारत – जन आरोग्य योजना’ हे अधिकृत अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावे.
-
‘वय वंदना कार्ड’ या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.
-
नाव, वय, पत्ता इ. माहिती भरल्यानंतर आधार पडताळणी केली जाईल.
-
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यावर अर्ज सबमिट करता येईल.
- या प्रक्रियेनंतर कार्ड थेट अॅपमध्ये डाउनलोड साठी उपलब्ध होईल आणि रुग्णालयात दाखल होताना त्याचा वापर करून लाभ घेता येईल. यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.
वय वंदना कार्डचे फायदे –
-
५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार:
देशभरातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये रुग्णाला कोणताही खर्च न करता उपचार करता येतील. -
सुलभ तपासणी व औषधोपचार:
तपासणीपासून उपचारापर्यंत सर्व सेवा सुलभ व प्राधान्याने मिळणार. -
डिजिटल कार्ड:
कुठेही जाता येईल, कागदपत्रे न नेता केवळ कार्ड वापरून आरोग्य सेवा मिळणार.
पात्रता व कागदपत्रे –
-
७० वर्षांवरील भारतीय नागरिक.
-
आधार कार्ड, वयाचा पुरावा, मोबाईल नंबर, आणि पत्ता पुरावा आवश्यक.
-
आयुष्मान भारत योजनेच्या यादीत नाव असणे आवश्यक.
‘वय वंदना कार्ड’ देशभरातील आयुष्मान भारत मान्यताप्राप्त सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये वापरता येणार आहे. संबंधित रुग्णालयांची यादी अॅपमध्ये किंवा अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. या निर्णयामुळे देशातील लाखो वृद्ध नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत नवा दिलासा मिळणार आहे. वयोवृद्धांसाठी ही योजना म्हणजे “आरोग्याच्या वाटचालीतील नवा आश्वासक टप्पा” ठरणार आहे.
———————————————————————————————–