प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
नागपूर : राज्याच्या वनविभागाने पुन्हा एकदा गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या Vantara या वन्यजीव पुनर्वसन केंद्राकडे वन्यप्राण्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वाढत्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५० बिबट्यांना जेरबंद करून या केंद्रात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयावर वन्यजीवप्रेमींनी तीव्र टीका केली आहे.
मानव-बिबट संघर्ष वाढल्याचा निष्कर्ष
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांपासून मानव-बिबट संघर्षाची समस्या कायम आहे. मात्र, अलीकडच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे गावांमध्ये आणि शहरांच्या परिसरात त्यांची हालचाल वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदीचा प्रयोग करण्याची तयारी वनविभागाने दर्शवली आहे. त्याचबरोबर काही बिबट्यांना पकडून त्यांना जामनगरमधील ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
वनतारा आणि वनविभागात करार
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी राज्यातील सुमारे ५० बिबट्यांना केंद्र सरकारच्या संमतीने ‘वनतारा’ येथे पाठवण्यात येणार आहे. या संदर्भातील करारावर मंत्रालयात वनविभाग आणि ‘वनतारा’ व्यवस्थापन यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
वनविभागाच्या मते, या उपक्रमामुळे बिबट्यांचे सुरक्षित संवर्धन होईल तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरही मोठ्या प्रमाणात तोडगा निघण्यास मदत होईल.
वन्यजीवप्रेमींची टीका
दरम्यान, वन्यजीवप्रेमींनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. बिबट हा वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असलेला प्राणी असल्याने त्याला सर्वोच्च संरक्षण आहे. अशा परिस्थितीत राज्यातून मोठ्या प्रमाणात बिबट्यांना हटवण्याचा निर्णय कसा आणि का घेण्यात आला, असा सवाल सामाजिक माध्यमांवर उपस्थित केला जात आहे.
याआधी विदर्भातून १५ वाघ
याआधी विदर्भात वाढलेल्या वाघ-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील Gorewada Wildlife Rescue Centre येथे ठेवण्यात आलेल्या सुमारे १५ वाघांना देखील ‘वनतारा’ येथे पाठवण्यात आले होते.
तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही हत्तींचीही पूर्वी या केंद्रात रवानगी करण्यात आली होती.





