मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आझाद मैदानात मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. राज्य मंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत घोषणा करत सांगितलं की येत्या १ ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यावर वेतन अनुदान जमा होणार आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने खासगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी: वेतन अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर केला असून, त्यासाठी दरवर्षी ९७० कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंत्रिमंडळात या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
याआधी ऑक्टोबर २०२४ मध्ये सरकारने टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. प्रारंभी २० % अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. दोन अधिवेशने पार पडल्यानंतरही पुरवणी मागणी सादर न झाल्याने शिक्षक वर्गामध्ये नाराजी पसरली होती.शिक्षक समन्वय संघ यामुळे आक्रमक झाला आणि त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केलं. त्यांच्या सातत्यपूर्ण मागण्यांमुळे सरकारला यावर तोडगा काढावा लागला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील अस्थैर्य काहीसं कमी होण्याची अपेक्षा आहे. आंदोलनाच्या यशस्वी नेतृत्वाबद्दल शिक्षक समन्वय संघाचं कौतुक होत आहे.
—————————————————————————–