कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
ऑक्टोबर पासून बँकिंग, रेल्वे सेवा, निवृत्ती वेतन, ऑनलाईन गेमिंग, एलपीजी सिलेंडर, पॅन कार्ड यामध्ये बदल करण्यात येणार आहेत. हे बदल दैनंदिन जीवनात थेट परिणाम करू शकतात.
नॅशनल पेन्शन सिस्टीम :
नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये आता मोठी सुधारणा होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने याला मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क असे नाव दिले आहे. हा बदल १ ऑक्टोबरपासून लागू होईल. आता गैर-सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग वर्कर्स एकाच पॅन नंबरवरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. याचा अर्थ आता निवृत्तीचे नियोजन करणे अधिक सोपे आणि सुरक्षित होईल.
रेपो दर कमी होऊ शकतो :
ऑक्टोबरच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होईल. बैठकीत रेपो रेट आणि इतर आर्थिक निर्णयांची घोषणा केली जाईल. तज्ज्ञांच्या मते, यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात होऊ शकते. असे झाल्यास गृहकर्ज आणि कार कर्जावरील व्याजदर कमी होऊ शकतात. इएमआय ही कमी होऊ शकतो, ज्यामुळे कर्ज फेडणे सोपे होईल.
रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बदल :
भारतीय रेल्वेने १ ऑक्टोबरपासून ट्रेन तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सुरुवातीची १५ मिनिटे फक्त त्या प्रवाशांना मिळतील, ज्यांचे खाते आधारशी व्हेरिफाइड आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळणे सोपे होईल. दलाल आणि तिकीट एजंटच्या मनमानीला आळा बसेल.
ऑनलाइन गेमिंगवर कडक नियम :
सरकारने ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर कडक नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू होतील. यामुळे खेळाडूंची फसवणुकीपासून सुरक्षा होईल. गेमिंग इंडस्ट्री अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनेल. कंपन्यांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
पीएफ काढणे होणार सोपे :
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खातेधारकांसाठी ऑक्टोबरमध्ये मोठे बदल होणार आहेत. किमान पेन्शन १५००-२५०० रुपयांपर्यंत वाढू शकते. EPFO ‘EPFO 3.0’ ही नवीन डिजिटल सेवा सुरू करणार आहे, ज्यामुळे सेवा अधिक स्मार्ट आणि वेगवान होईल.
युपिआय मध्ये होणार बदल
एनपीसीआयने पूल ट्रान्झॅक्शन फीचर म्हणजेच ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उद्देश ऑनलाइन फसवणूक आणि फिशिंगपासून युजर्सना सुरक्षित ठेवणे, तसेच डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करणे हा आहे.
एलपीजी दरात बदलाची शक्यता
१ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा बदल दिसू शकतो. गेल्या महिन्यात १४ किलोच्या घरगुती सिलेंडरचा दर १६३१.५० रुपयांवरून १५८० रुपये झाला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या जीएसटी कपातीचा सिलेंडरच्या दरावर परिणाम झाला नव्हता. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही लोकांना एलपीजी दराच्या अपडेटवर लक्ष ठेवावे लागेल.
एक पॅन, अनेक योजना
पूर्वी एनपीएसमध्ये एका पॅन नंबरद्वारे फक्त एकाच योजनेत गुंतवणूक शक्य होती, पण एमएसएफ अंतर्गत आता सोयीनुसार आणि जोखीम क्षमतेनुसार अनेक योजना निवडू शकता. जे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत, ते बॅलन्स्ड किंवा डेट स्कीम निवडू शकतात. ज्यांना जास्त परतावा हवा आहे, ते १०० टक्के इक्विटी आधारित योजनांमध्ये पैसे गुंतवू शकतात. या बदलामुळे एनपीएस गुंतवणूकदार आता आपली पेन्शन योजना अधिक स्मार्ट, लवचिक आणि चांगला परतावा देणाऱ्या पद्धतीने मॅनेज करू शकतील.
__________________________________________________________________