अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत वाढणार चुरस

0
427
Reservation for the posts of Zilla Parishad chairpersons has been announced and accordingly, the post of Kolhapur Zilla Parishad chairperson has been reserved for general women.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित झाली असून आता आरक्षण जाहीर होण्याची प्रतिक्षा होती. दरम्यान, ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले असून त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय चुरस वाढली आहे.

प्रभाग रचनेवरून काही इच्छुक उमेदवार आणि नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या असून निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग निश्चित असले तरी आरक्षण जाहीर होण्याची प्रतीक्षा असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्ही निर्माण झाले होते. आता आरक्षण जाहीर झाल्याने गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे.
रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड या ठिकाणी महिला मागस प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे.
अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरल्याने मातब्बर नेतेमंडळींच्या पत्नी, सुना आणि इतर महिला नेतृत्व पुढे येण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यातील पक्षीय गटबाजीला नवे स्वरूप मिळण्याची चिन्हे असून प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे. महिलांना नेतृत्वाची संधी मिळणार असली तरी पक्षांतर्गत समन्वय आणि उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र होणार आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या आरक्षणामुळे पुढील पिढीतील महिला नेतृत्वाला संधी मिळण्यास मदत होईल, पण त्याचवेळी निवडणुकीत नवे समीकरण आणि राजकीय रणनीतींचे खेळ रंगण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या विकास आराखड्यावरही या नेतृत्वाचा प्रभाव पडणार असून मतदारांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.

आगामी काही आठवड्यांत उमेदवारी अर्ज, प्रचार, गटबांधणी आणि न्यायालयीन याचिकांच्या निकालावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. दिवाळीनंतर निवडणूक लागण्याची शक्यता असून प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे.

——————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here