अमोल शिंगे : प्रसारमाध्यम न्यूज
१६ मे २०२५… महाराष्ट्राच्या सामाजिक आणि अप्रत्यक्षपणे राजकीय क्षेत्रातील काळा दिवस.. संत आणि समाज सुधारकांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात या दिवशी एका महिलेने सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली.. कारण होतं हुंडा.. स्वतःला सुशिक्षित आणि राजकीय घराणं समजणाऱ्या एका कुटुंबाच्या आर्थिक लालसेने एका निष्पाप तरुणीचा अक्षरशः जीव घेतला आणि सगळा महाराष्ट्र हादरून गेला..
लग्नातच ५१ तोळे सोनं, साडे सात किलोची चांदीची भांडी आणि एक आलिशान महागडी चार चाकी गाडी असा ‘हुंडा’ देऊन देखील आणखी दोन कोटींच्या मागणीसाठी हगवणे कुटुंबियांनी २४ वर्षीय वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु केला होता. अखेर वैष्णवी हगवणे या २४ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि तिच्या या आत्महत्येने ‘हुंडा’ बळी सारखा गंभीर विषय पुन्हा ऐरणीवर आला. आपला समाज अजूनही असल्या समाज विघातक प्रथांमध्ये अडकून पडल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
हुंडा म्हणजे विवाहाच्या वेळी वरपक्षाकडून वधूपक्षाने पैसे, दागदागिने, वस्तू, स्थावर किंवा जंगम मालमत्ता इत्यादी स्वरूपात दिले जाणारे वैध किंवा अवैध देणगी वा संपत्ती. हुंडा ही जुनाट संकल्पनाच मुळात पुरुष प्रधान व्यवस्थेने निर्माण केलेली आहे. वर पक्षाने लग्नात वधू पक्षाकडून पैसे, दागदागिने, वस्तू, स्थावर किंवा जंगम मालमत्ता यांची अपेक्षा ठेवणे म्हणजेच एकार्थी स्त्रिला समजत दुय्यम स्थान देणं असंच अधोरेखित होतं. हुंडा या प्रथेमुळे समाजात महिलांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत होतं. देशात हुंडा बळींच्या संख्येत वाढ होत असल्याचे लक्षात येताच अखेर १९६१ मध्ये भारत सरकारने ‘हुंडा प्रतिबंध कायदा’ अस्तित्वात आणला.
आपण पहिल्यांदा या कायद्यांतर्गत काय तरतुदी करण्यात आहेत तरतुदी –
कलम ३ – हुंडा घेणे व देणे गुन्हा आहे:
विवाहाच्या वेळी हुंडा घेणे किंवा देणे, दोन्ही गुन्हा मानले जाते. दोषी आढळल्यास ५ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि किमान १५,००० रुपये दंड किंवा हुंड्याच्या रकमेइतका दंड, यापैकी जो जास्त असेल तो होऊ शकतो.
कलम ४ – हुंडा मागणी करणे गुन्हा आहे:
हुंडा मागणे हा स्वतंत्र गुन्हा आहे. शिक्षा ६ महिन्यांपासून २ वर्षांपर्यंत आणि दंड किमान १०,००० रुपये इतका असू शकतो.
कलम ६ – हुंड्याची संपत्ती वधूचीच असते:
विवाहानंतर वधूपक्षाकडून आलेली कोणतीही संपत्ती ही वधूची वैयक्तिक मालमत्ता समजली जाते आणि ती तिला परत मिळाली पाहिजे.
कलम ८ – गुन्हा अजामीनपात्र आणि दखलपात्र:
या कायद्यांतर्गत गुन्हा अजामीनपात्र व दखलपात्र आहे. म्हणजेच पोलिसांना चौकशी करण्यासाठी थेट अटक करता येते.
या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने आणि न्यायालयांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. पण या कायद्याची अपेक्षित असणारी अंमलबजावणी होताना दिसलेली नाही. काही वेळा या कायद्याचा गैरवापर केल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी वेळोवेळी समतोल राखणारे निर्णय दिले आहेत. अनेक राज्यांनी मध्यस्थी मंडळे स्थापन केली आहेत जेणेकरून खोट्या तक्रारींना आळा घालता येईल. परंतु या समाज विघातक प्रथेला कायदा पूर्णपणे वचक घालू शकलेला नाही. २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात ९९८ महिलांचा हुंडा प्रथेमुळे मृत्यू झाला आहे, म्हणजे दरवर्षी सरासरी २०० हून अधिक हुंडा मृत्यूंची नोंद झाली आहे . या प्रकरणांमध्ये अनेकदा महिलांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलेला आहे आणि यामुळेच हे मृत्यू झालेले आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या २०२४ च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातून १,३१७ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यात हुंडा छळाच्या तक्रारींचा समावेश आहे . या तक्रारींमध्ये हुंडा मागणी, मानसिक छळ, आणि अन्य संबंधित अत्याचारांचा समावेश आहे. याच परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी हुंडाबळीची घटना पुण्यात घडली. पुणे जिल्ह्याच्या मुळशी मुळशी तालुक्यातील भूक्कम येथील हगवणे या ‘हाय प्रोफाईल’ कुटुंबातील वैष्णवी हगवणे या २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नातच तिच्या माहेरच्यांनी लग्नातच ५१ तोळे सोनं, साडे सात किलोची चांदीची भांडी आणि एक आलिशान महागडी चार चाकी गाडी असा ‘हुंडा’ हगवणे कुटुंबियांना दिला होता. पण हगवणे कुटुंबियांची लालसा काही थांबली नव्हती. या लालसे पोटी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला होता. या छळाला कंटाळून वैष्णवी हिने १६ मे २०२५ रोजी अखेर गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. हगवणे कुटुंबिय एका राजकीय पक्षाशी निगडीत असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
हे प्रकरण ताजे असतानाच १९ मे २०२५ ला पुण्यातील हडपसर येथील दीपा पुजारी या २२ वर्षीय विवाहीतीने सासरच्या आर्थिक मागणीला अर्थातच हुंड्यासाठी असणाऱ्या तगाद्यातून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. दीपाच्या लग्नात तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी ४ तोळे सोने आणि अंदाजे १० लाख रुपये खर्च केले होते. वरील दोन्ही घटनेत देणाऱ्यांची ऐपत लक्षात घेऊनच मागणाऱ्यांची लालसा वाढलेली असल्याचे दिऊन येत आहे. ‘हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार’ हुंडा घेणाऱ्याबरोबर देणाराही तेवढेच गुन्हेगार असतो. तरीसुद्धा आपल्या समाजात अजूनही ‘हुंडाबळी’ का जात आहेत? या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न फक्त सरकारलाच नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला करावा लागणार आहे. अन्यथा तुमच्या आमच्या आसपास असणाऱ्या वैष्णवी आणि दीपा महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या ‘हगवणे’ वृत्तीला बळी पडत जातील.
वैष्णवी हगवणे ही एका हाय प्रोफाईल आणि राजकीय कुटुंबाशी निगडीत असल्याने तिच्या आत्महत्येनंतर राजकीय, सामाजिक आणि सेलिब्रेटी क्षेत्रातील लोकांनी आरोप प्रत्यारोप आणि वक्तव्यं केल्याने या घटनेला राजकीय, सामाजिक आणि माध्यमांचं व्यासपीठ मिळालं पण आत्तापर्यंत सामान्य कुटुंबातील हजारोंच्या संख्येने हुंडाबळी गेलेल्या निष्पाप भगिनींना हे व्यासपीठ नशिबी आलंच नाही .. स्टोव्हचा भडका, पदर पेटला आशा अपघातांच्या गोंडस नावाखाली कितीतरी हुंडाबळी प्रकरणं दाबली गेली.



