राधानगरी प्रतिनिधी (उत्तम पाटील ) : प्रसारमाध्यम न्यूज
वळीवडे शिरोळ आणि रुई या ठिकाणावरील बंधाऱ्यांचे बरगे नदीतील पाण्यामुळं काढता आले नाहीत.त्यामुळं अद्याप राधानगरी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. दोन दिवसात बंधाऱ्यामधील बरगे काढून धरणातून दररोज चौदाशे ते पंधराशे क्यूसेक्सने विसर्ग सुरू करून धरणातून जास्तीत जास्त पाण्याचा विसर्ग करण्याचं नियोजन जलसंपदा विभागाने आखलं आहे.राधानगरी आणि तुळशी धरणाचा विसर्ग पूर्णतः बंद आहे तर दूधगंगा धरणातून दोनशे क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीतील वळीवडेतील सुर्वे बंधारा,शिरोळ आणि रुई बंधाऱ्याच्या पात्रात पाणी असल्याने बंधाऱ्यामधील पाणी अडवण्याचे बरगे काढता आलेले नाहीत. दोन दिवसात बंधारे काढून जास्तीत जास्त विसर्ग करून धरणाची पातळी नियंत्रणात ठेवण्याचं जलसंपदा विभागाचं नियोजन असल्याची माहिती राधानगरी धरणाचे शाखा अभियंता समीर निरुखे यांनी दिली आहे. यावर्षी २० मे रोजीच पावसाने संतधार सुरू केल्यानं जलसंपदा विभागाचं पाणी विसर्गाचं नियोजन कोलमडल्याचं दिसून येत आहे.
साधारणता १ जून ते ८ जूनच्या दरम्यान नद्यांतील असणाऱ्या बंधाऱ्यांचे बरगे काढून नदीमधील प्रवाह सुरळीत केला जातो परंतु यावर्षी पावसाने अगोदरच सुरुवात केल्यामुळं जलसंपदा विभागाला धरणातील पाणी निसर्गाला मोठा अढथळा निर्माण झाला आहे. नदीमध्ये अद्याप काही बंधाऱ्यावरील बरगे न काढल्यामुळं धरणांमधून विसर्ग करण्याची गरज असतानाही अद्याप विसर्ग सुरू केलेला नाही. राधानगरी धरणामध्ये ४.४३ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा ५२.९२% इतका आहे. धरणामध्ये १ जून ते आज पर्यंत ५७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी असला तरी नद्यांमधील बरगे न काढल्यामुळे धरणातून अद्याप विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. धामोड इथंल्या तुळशी धरणामध्ये १.८८ टीएमसी पाणीसाठा असून ५४.१५% धरण भरलेलं आहे तर दूधगंगा धरणामध्ये ५.३६ टीएमसी पाणीसाठा असून धरण २१.९% इतकं भरलेलं आहे. राधानगरी आणि तुळशी धरणातील विसर्ग पूर्णतः बंद आहे तर दूधगंगा धरणातून दोनशे क्यूसेक्सने दूधगंगा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे.
तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसला तरीसुद्धा भविष्यातील धरणाच्या पाणी नियोजनासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करणे गरजेचं आहे. परंतु काही बंधाऱ्यांमधील पाणी अडवण्यासाठीचे बरगे काढले नसल्यामुळे विसर्ग करणे शक्य नाही.येत्या दोन दिवसात पाणी निसर्गाचं नियोजन सुरळीत होईल असा अंदाज जलसंपदा विभागानं व्यक्त केला आहे.



