spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeइतिहासकुऱ्या चालल्या रानात, सुरू झालीया पेरणी...

कुऱ्या चालल्या रानात, सुरू झालीया पेरणी…

कृष्णात चौगले : प्रसारमाध्यम न्यूज

यावर्षी अवकाळी पावसाने लवकर हजेरी लावली. तो सलगपणे सुरू झाल्याने रानाच्या मशागती झाल्या नाहीत. शेतातनं पाणी भरून राहिलं. त्यामुळे रोहिणीचा पेरा साधता आला नाही. रोहिणीचा पेरा ते मिरगाच्या नक्षत्रांपर्यंत गावगाड्यात पेरणीची लगीन घाई असतीया. सगळ्या शिवारातनं, रानामाळातनं मशागतीची कामं सुरू असत्यात. बांध घालायचं, सड वेचायचं, खोडव्याचं रान वेचायचं अशी कामं वेगानं सुरु असत्यात. काही वर्षापूर्वी बैलाच्या औतानी शेती हाताखाली आणली जायची.  कुळवावर व दिंडावर बसायची बारक्या पोरांची घाई असायची. अलिकडे शेतांच्या मशागतीत ट्रॅक्टर आणि यांत्रिक अवजारांनी एंट्री केल्याने बैलांच्या मशागती आता कमी झाल्या आहेत. परिणामी, साऱ्या शिवारांतून सर्जा राजांचा आवाज दुर्मिळ होत असून जुने दिवस कुठंतरी हरवत चालल्या सारखे वाटताहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाची धांदल सुरू झाली आहे. प्रत्येक गावाचा शिवार शेतकऱ्यांच्या श्रमांनी भरून गेलाय. पावसाच्या उघडीपीने अनेक गावांतील शिवारात पेरणीसाठी घाई सुरू झालीया. शेतातली मशागत, बांधबंदिस्ती, कुंड्या खोदणं, नांगरट करून भातासाठी रानं तयार करणं आणि मग कुरी ओढून भात पेरणं हे सगळं सुरु झालं आहे. शेतकरी पोटाची झोळी भातानं भरतो आणि मुठीतून ते भात कुरीतून सोडतो आणि भाताचं दाणं जमिनीआड घातलं जातं.  काळ्या आईच्या उदरात भाताची बी घालून बळीराजा आपलं सपानंच पुरतं असतो.

गावागावांतून काही पेरके हे पेरणीत निष्णात असतात. त्यांना गावभर पेरणीसाठी मागणी असते. दिवस दिवसभर बांधावर बसून त्यांना आपल्या शेताच्या पेरणीसाठी घेऊन जावे लागते. रानामाळांतन असा पेरणीचा फेरा सुरू झाला आहे. दिवसाच्या मध्यावर शेताच्या झाडाखाली पारंपरिक स्वरूपात पंगत पडते. भाकरी, ठेचा, कांदा, आणि घरचं बनवलेलं दही, कैरीचं लोणचं यांचा फक्कड अस्वाद घेतला जातो. ग्रामीण भागातून शेतातली पंगत ही आता नजरेआड होत चालली आहे.  

पावसाच्या उघडीपीने ग्रामीण भागांत बैलांच्या औतांनी मशागती सुरू झाल्या आहेत.
गडहिंग्लज, कागल, करवीर, राधानगरी या तालुक्यांतून मुंबई, पुणे इथं गेलेले अनेक युवक पेरणीसाठी गावात परतत असतात. पेरणीची घाई असते. गावांतून पेरायला माणसं मिळत नाहीत. घरची दोन चार असली की, कितीबी रान असलं तरी पेरून होतंय. यासाठी पैरा केला जातो. आता पावसाच्या या उघडीपीनं ग्रामीण भागांतून ‘पेरणीचा सण’ पुन्हा नव्यानं अनुभवला जात आहे.

अलिकडे ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्र आले असले, तरी आजही अनेक शेतकरी पारंपरिक ‘कुरीनेच पेरणी करतात. यामागचं कारण केवळ आर्थिक नाही, तर भावनिक आहे. “ट्रॅक्टर शेतातलं काम उरकतो, पण शेतीशी नातं जोडत नाही!” असं सांगणारी माणसं अजूनही खेड्या पाड्यांतून आहेत. काही घरांतून जादा शेती पेरायची असली तरं शेतकरी आजही बैलजोडीनं बियाणं पेरतात.

कधी काळी शिवारातल्या सकाळी बैलांच्या घंटानादाने जाग यायची. सर्जा-राजा रानात उतरले, की गावाला जीव मिळाल्यासारखं वाटायचं. पण यंदा रोहिणीचा पेरा न झाल्याचा खेद आणि मशागतीवर पावसाचा पगडा या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट ठळकपणे जाणवते. मातीशी असलेलं नातं हळूहळू रूप बदलतंय…यांत्रिकीकरण गरजेचं आहे, तसं ते शेतकऱ्याच्या मदतीचं साधनही आहे; पण हे साधन जसं जसं वाढतंय, तस तशी बैलजोड्यांचे गोठे ओसाड होतायत, आणि कुळवावरच्या पोरांची स्पर्धा आता मोबाईलवरच्या गेममध्ये हरवतेय.

आधी पेरणी म्हणजे सण होता आज तो एक ‘काम’ झाल्यासारखा वाटतो. गावातला उत्साह, बळिराजाचं रानाशी जिवंत नातं हे सारे हळूहळू इतिहास होऊ पाहत आहेत. पण अजूनही काही थोडे शेतकरी, काही थोड्या बैलजोड्या, आणि काही जुन्या आठवणी या सगळ्यांतून कोल्हापूरच्या मातीचा, रानाचा आणि परंपरेचा गंध अजूनही दरवळतो आहे…तो गंध जपणं हे आजचं खरं पेरणं आहे.

 


RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments