कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आजचा दिवस कोल्हापूर व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाचा व ऐतिहासिक ठरला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला अखेर यश मिळाले असून, कोल्हापूरचे खंडपीठ – सर्किट बेंच – आज अधिकृतरित्या नोटिफाय करण्यात आले आहे.
या आनंदवार्तेची माहिती खास दिल्लीतून नागपूरकडे हवाई प्रवास करत असताना, भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनी स्वतः दिली. त्याच विमानात त्यांच्यासमोर बसलेले कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे यांच्याशी बोलताना त्यांनी अत्यंत आनंदाने सांगितले की – “राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो – कोल्हापूरचे खंडपीठ आजच नोटिफाय झाले आहे.”
मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृतरित्या कोल्हापुरातील सर्किट बेंचला मंजुरी दिली असून, हे बेंच येत्या १८ ऑगस्ट पासून कार्यान्वित होणार आहे. यामुळे कोल्हापूरातील न्यायप्रेमी नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधव, बार असोसिएशन्स, आणि सर्व पक्षकारांनी दिलेला सातत्यपूर्ण लढा यशस्वी ठरला आहे. न्यायासाठी दूर मुंबई किंवा औरंगाबादला जावं लागत होतं, त्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा मिळाला आहे.
खंडपीठासाठी लढा दिलेल्या सर्व वकील बांधवांचे, कोल्हापूरकरांचे व पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन ! हा निर्णय केवळ न्यायदान सुलभ करण्यासाठीच नाही, तर कोल्हापूर व परिसराच्या सामाजिक-आर्थिक विकासातही मोलाची भर टाकणारा ठरेल, यात शंका नाही.
———————————————————————————————–







