अमोल शिंगे : प्रसारमाध्यम न्यूज
चहा हे केवळ पेय नाही तर ते एक भावना आहे.. एक संवाद आहे.. आणि एक सांस्कृतिक दुवा आहे. एवढेच नाही तर आपल्या भारत देशामध्ये चहा हा दैनंदिन जीवनाचा अनिवार्य घटक आहे. अगदी हाच गाभा पकडून चहाच्या व्यवसायात नव नवीन बदल घडून येत आहेत. पारंपारिक चहाच्या टपरीची जागी पाश्च्यात्य पद्धतीच्या ‘फ्रँचायझी’ घेत आहेत. तरुण चहाच्या या ‘फ्रँचायझी’ संस्कृतीकडे करियर म्हणून पाहू लागले आहेत. अमृततुल्य चहा ते बासुंदी चहा असा चहाचा प्रवास आता पुन्हा एकदा गुळाच्या चहापर्यंत येऊन पोहचला आहे..
भारतात आज चहा म्हणजे एक अनिवार्य सवय, एक आदरातिथ्याचा भाग, आणि एक सामाजिक बंध म्हणून समाजात खोलवर रुजला गेला आहे. चहा आणि आपल्या देशाचा संबंध तसा १९ व्या शतकाच्या सुरवातीपासून आला. पंचतारांकित हॉटेल ते रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या चहाच्या टपरीवर जाऊन चहा पिणारा चहाचा भयंकर तलपी वर्ग आपल्या समाजात आहे. भारतीयांच्या या तलपेनेच अनेक बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिला आहे.
हॉटेल आणि टपरी या पारंपारिक पद्धतीने चहाचा व्यवसाय करून अनेकांनी यश संपादन केले. यानंतर अमृततुल्य चहाचा जमाना उदयाला आला. यात काही नामांकित ‘ब्रँड’ नी चहाच्या व्यवसायात एक वेगळा ट्रेंड निर्माण केला. आकर्षक मांडणी आणि चहा बनवण्याची थोडी वेगळी पद्धत या जोरावर या नामांकित ‘ब्रँड’ नी आपल्या दुकानात गर्दी जमवून तेजीत व्यवसाय केला. अमृततुल्य चहानंतर ‘बासुंदी’ चहाची ‘क्रेझ’ चहाच्या शौकिनांमध्ये निर्माण झाली. ‘बासुंदी’ चहाच्या शाखा गावागावात उभ्या राहिल्या आहेत. काही काळ या दोन्ही संकल्पना पारंपारिक पद्धतीनेच चालल्या पण कालांतराने याला मोठे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आणि आपल्या शाखा म्हणजेच फ्रँचायझी देऊन आपल्या चहाच्या ‘ब्रँड’ची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले.
नोकऱ्यांची वानवा आणि वाढत चालेली बेकारी या सामाजिक परिस्थितीत रोजगार मिळवण्यासाठी तरुण या चहाच्या फ्रँचायझीकडे आपसूक वळाल्याचे दिसून येत आहे. त्या ‘ब्रँड’चे गुडविल म्हणजेच नावलौकिक हे सर्वात मोठं भांडवल असल्याने व्यवसायात यश मिळण्याची खात्री या व्यवसायात करिअर करणाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. फ्रँचायझी घेतली की त्या ‘ब्रँड’ची सेवा आणि उत्पादने तयार स्वरुपात मिळतात हा एक यातील महत्वाचा भाग आहे. फ्रँचायझी या संकल्पनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊ..
फ्रँचायझी म्हणजे काय?
फ्रँचायझी म्हणजे एखाद्या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने आणि त्यांच्या पद्धतीने व्यवसाय चालवण्याचा अधिकार. यात व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सोपी होते कारण:
नाव प्रसिद्ध असते
उत्पादने व सेवा तयार असतात
प्रशिक्षण व मार्केटिंगची मदत मिळते
चहाच्या फ्रँचायझीचे फायदे :
सध्या मागणी जास्त: भारतात दररोज कोट्यवधी लोक चहा पितात. त्यामुळे बाजार सदैव तयार असतो.
कमी गुंतवणूक: इतर व्यवसायांपेक्षा कमी पैशात चहाचे फ्रँचायझी आउटलेट सुरू करता येते.
ब्रँडची ताकद: ग्राहक विश्वासाने तुमच्याकडे येतात कारण नाव आधीच ओळखलेले असते.
प्रशिक्षण व मार्गदर्शन: मुख्य कंपनी तुम्हाला रेसिपी, स्टाफ ट्रेनिंग, व मार्केटिंगसाठी सहाय्य करते.
गुंतवणुकीचा अंदाज (२०२५):
महाराष्ट्रातील नामांकित ब्रँडची फ्रँचायझी घ्यायची असेल तर ३ ते ६ लाखांपर्यंत गुंतवणूक करायला लागते. यासाठी २०० ते २५० चौरस फुट जागा गरजेची असते.
सहज सोप्या पद्धतीने मिळणारा व्यवसाय म्हणून या चहाच्या फ्रँचायझीकडे तरुणांनचा कल वाढताना दिसत आहे. चांगला परतावा आणि सतत वाढणारी ग्राहकांची संख्या हे या व्यवसायाचे मुख्य आकर्षण आहे. स्थिरता आणि कमी धोका असा हा व्यवसाय असल्याने करिअरसाठी चहाची फ्रँचायझी योग्य पर्याय ठरत असल्याचे दिसत आहे.



