प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, खुद्द सुप्रिया सुळे यांनी पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी रेवतीचा विवाह निश्चित झाला आहे.
आई सुप्रिया सुळेंनी दिली आनंदाची बातमी
सुरुवातीला सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय आणि स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात सूचक पोस्ट केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली. अखेर सुप्रिया सुळे यांनी रेवती आणि सारंग यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “अतिशय आनंदाने आम्ही हे सांगू इच्छितो की आमची लेक रेवती हिचं वंदना आणि अरुण लखानी यांचा मुलगा सारंगशी लग्न ठरलं आहे.” या घोषणेनंतर सुळे आणि पवार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोण आहे भावी जावई सारंग लखानी?
-
नागपूरचे सुपुत्र: सारंग लखानी हे मूळचे नागपूरचे आहेत.
-
कौटुंबिक पार्श्वभूमी: ते प्रसिद्ध व्यावसायिक आणि ‘विश्वराज ग्रुप’चे अध्यक्ष अरुण लखानी यांचे चिरंजीव आहेत.
-
क्रीडा क्षेत्राची आवड: सारंग हे स्वतः एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. त्यांचे वडील अरुण लखानी हे देखील बॅडमिंटन असोसिएशनशी निगडीत असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
राजकीय मध्यस्थीची चर्चा
या विवाहसंबंधाबाबत एक विशेष बाब म्हणजे, हे लग्न जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.





