कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटात कोल्हापुरातील हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मोगलगड येथील बॉक्साइट खाण प्रकल्पाला केंद्र सरकारच्या वन सल्लागार समितीने अंतिम म्हणजेच स्टेज-२ मंजुरी नाकारली आहे. ३० जुलै रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार हा प्रस्ताव संवर्धन राखीव क्षेत्राचा भाग असून सध्या कोणताही वैध खाण भाडेपट्टा अस्तित्वात नाही.
संवेदनशील क्षेत्रातील वन्यजीव वाचवण्यासाठी नकार
पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाने समितीसमोर मांडलेल्या अहवालानुसार या भागात हत्ती, गवा, सांबर, हरण, साळींदर, बिबट्या आणि वाघ यांचा वावर आहे. पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने येथे खाणकामावर बंदी आहे. त्यामुळे १६ हेक्टर राखीव वनक्षेत्र ( ज्यात प्रत्यक्ष वळवलेले क्षेत्र ९.०५ हेक्टर आहे ) खाणकामासाठी देण्याचा प्रस्ताव समितीने नाकारला.
मंजुरी असूनही खाणकाम नाही
या प्रकल्पाला २००९ मध्ये तत्त्वतः वनमान्यता आणि २०१४ मध्ये पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. मात्र, कंपनीला वन संसाधनांचे अधिकार प्रमाणपत्र न मिळाल्याने अंतिम मंजुरी मिळाली नाही. गेल्या अनेक वर्षांत कंपनीने या भाडेपट्ट्यावर कोणतेही खाणकाम केलेले नाही.
स्थानिकांचा विजय : ३० वर्षांची लढाई फळाला
या निर्णयाने स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. “मोगलगड हे चंदगड तालुक्यातील राखीव वन क्षेत्र आहे. पश्चिम घाट वाचवण्यासाठी खाणकामाला विरोध करण्याची लढाई आम्ही गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ लढत आलो. आजचा निर्णय हा त्या संघर्षाचा विजय असून पुढील काळात पश्चिम घाटातील सर्व खाणकाम थांबवण्याचा आदर्श या निर्णयातून निर्माण होईल,” असे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचे रक्षण, वन्यजीवांचे संवर्धन आणि स्थानिक पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्राने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. या निर्णयामुळे पश्चिम घाटातील भविष्यातील खाणकाम प्रकल्पांवरही मर्यादा येणार आहेत.
—————————————————————————————