नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १२ हजार कोटी रुपयांच्या लक्षित सबसिडीला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, याचा लाभ देशातील सुमारे १०.३३ कोटी कुटुंबांना होणार आहे.
अधिकृत निवेदनानुसार, पीएमयूवाय लाभार्थ्यांना दरवर्षी ९ एलपीजी सिलिंडरवर प्रति सिलिंडर ३०० रुपयांची लक्षित सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेसाठी येत्या आर्थिक वर्षात एकूण १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे २०१६ मध्ये सुरू झाली. याचा उद्देश देशातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना कोणतेही सुरक्षा पैसे न भरता मोफत एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देणे हा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १ जुलै २०२५ पर्यंत देशभरात या योजनेअंतर्गत १०.३३ कोटी कनेक्शन वितरित करण्यात आले आहेत.
भारत आपली सुमारे ६० टक्के स्वयंपाक गॅसची गरज आयात करतो, त्यामुळे गरीब कुटुंबांना स्वस्त दरात गॅस उपलब्ध करून देण्यासाठी आणि पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही योजना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची ठरते.
—————————————————————————————————