मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आंदोलक आणि सरकार दोघांनाही कठोर शब्दांत सुनावले.
कोर्टाने स्पष्ट केले की, आंदोलनाला ठराविक अटी-शर्ती घालून परवानगी देण्यात आली होती, मात्र त्या पाळल्या गेल्या नाहीत. याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांना थेट फटकारले. आंदोलकांना फक्त पाच हजारांपर्यंत परवानगी होती, मग अतिरिक्त लोक कसे आले? आझाद मैदानात तंबू असताना आंदोलक रेल्वे स्टेशनमध्ये का जात आहेत? असे प्रश्नही कोर्टाने उपस्थित केले.
सुनावणीत सरकारने माहिती दिली की, आंदोलकांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत, रस्ता रोको करण्यात आला आहे, गाड्या अडवल्या जात आहेत. शिवाय बाहेरून लोकांना बोलावलं जात असल्याची धमकीही देण्यात आली आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडून त्यांची खेळणी बनवली, तर सिग्नलवर नाचत असल्याचे व्हिडिओही कोर्टात सादर करण्यात आले.
यावर नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने विचारलं की, “आज आंदोलक रस्त्यावर कबड्डी खेळतायत, उद्या क्रिकेट खेळायला सुरुवात करणार काय?” वानखेडे किंवा ब्रेबॉन स्टेडियम आंदोलनासाठी द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत असताना, ही दोन्ही मैदाने आयकॉनिक आहेत, तुम्हाला नेमकं काय हवंय हे समजतं का? असा प्रतिप्रश्नही न्यायालयाने केला.
कोर्टाने आंदोलकांना बजावलं की, अटी-शर्तींच्या चौकटीत राहूनच आंदोलन करावे लागेल. बाहेरून येणाऱ्यांना मुंबईच्या बाहेरच थांबवावे, जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला कुठलाही अडथळा होता कामा नये, असेही न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले.
सरकारने कोर्टात सांगितलं की, हे आंदोलन बेकायदेशीर आहे आणि आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र कारवाईसाठी कोर्टाने आदेश द्यावेत, अशी मागणी सरकारने केली. दरम्यान, आंदोलकांकडून “जर आंदोलकांना थांबवलं, तर किमान जेवणाच्या गाड्या तरी मुंबईत सोडा, आमचं जेवण अडवू नका,” अशी मागणी कोर्टात झाली.
याचिकाकर्ते, सरकार आणि आंदोलनकर्ते यांचं म्हणणं ऐकल्यानंतर कोर्टाने मोठा आदेश दिला आहे. मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरूव हटवा असे आदेश सरकारला दिले आहे. तसेच आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा, उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत ही कारवाई करा असं कोर्टाने म्हटलं आहे. मराठा आंदोलनाबाबत झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटलं की, आंदोलनाचे आयोजक यांची जबाबदारी होती की ५ हजारपेक्षा अधिक लोकांना आणू नये. मुंबईतल्या आझाद मैदान व्यतिरिक्त इतर ठिकाणी ते वावरू नयेत. तसेच सकाळी ९ ते ६ पर्यंत आझाद मैदानात परवानगी होती. त्यानुसार त्यांनी ६ नंतर मैदान खाली करणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही.
गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र आंदोलकांवर गंभीर आरोप करत म्हटलं की, आंदोलक गाड्यांमधून दारू आणत आहेत आणि पोलिसांना त्रास देत आहेत, त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी.
या सर्व घडामोडींनंतर सोमवारी न्यायालयाने कोणतेही आदेश न देता सुनावणी तहकूब केली. आता २ सप्टेंबर (मंगळवार) रोजी मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे.
————————————————————————————————-