Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

कल्याण : महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) मध्ये स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता या दोन महत्त्वाच्या पदांवरून राजकीय वातावरण तापले आहे. येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेपूर्वीच शिवसेना आणि भाजपामध्ये या पदांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

महासभेत सर्वप्रथम स्थायी समिती सदस्यांची निवड होणार असून त्यानंतर सभापती पदाची निवड केली जाणार आहे. सध्या महापौर पद शिवसेनेकडे आहे. शिवसेना आणि मनसे मिळून ५९ सदस्य असल्याने शिवसेनेने स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता या दोन्ही पदांवर दावा कायम ठेवला आहे.

दुसरीकडे भाजपनेही या दोन्ही पदांवर आपला हक्क सांगितला आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता पद भाजपालाच मिळावे, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.

भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, “भाजप कार्यकर्त्यांना वाटते की स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता हे दोन्ही पद भाजपकडे असावे. त्यासाठी कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला असून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.” महायुतीत भाजपचेही बळ असल्याने ही पदे भाजपकडे यावीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभागृहात महिलाराज आणण्याची शक्यता

दरम्यान, शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, “महापौर शिवसेनेचा असल्याने स्थायी समिती सभापतीही शिवसेनेचाच असावा. भाजप आग्रही असेल तर शिवसेना देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे.”

या संदर्भात अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या चर्चेनंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात महिलांना अधिक संधी देण्याच्या धोरणानुसार पुढील पदांवर महिलांची निवड होण्याची शक्यता असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

महापौर निवडीनंतर आता KDMC मधील स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता या पदांसाठी शिवसेना-भाजपामध्ये राजकीय चुरस वाढली असून १६ फेब्रुवारीच्या महासभेनंतर या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here