नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५०% टॅरिफ लावल्यानंतर निर्माण झालेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने भारताला ठाम पाठींबा दर्शवला आहे. कोलंबो जिल्ह्याचे खासदार आणि माजी आर्थिक सुधारणा मंत्री हर्षा डी सिल्वा यांनी श्रीलंकन संसदेत तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर भारताच्या भूमिकेचे कौतुक केले.
संसदीय चर्चेत डी सिल्वा म्हणाले, “भारतावर हसू नका. ते अडचणीत आहेत म्हणून त्यांची थट्टा करू नका, कारण जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा त्यांनीच आपल्याला मदत केली होती. डाव अजून पूर्ण संपलेला नाही; अंतिम निर्णय येईपर्यंत निष्कर्ष काढू नका.”
दरम्यान, ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “ ट्रम्प यांच्या व्यापार शुल्का विरुद्ध भारताच्या धाडसी भूमिकेची खिल्ली उडवल्याबद्दल संसदेत सरकारचा निषेध केला. भारत आपला खरा मित्र आहे. आपल्या कठीण काळात भारत आपल्या पाठीशी उभा राहिला. आपण त्यांच्या लढाईचा सन्मान केला पाहिजे. भारताचे धाडस आशियाला प्रेरणा देते ! ”
अमेरिकन टॅरिफचा धक्का
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतातून येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५% टॅरिफ लावले, ज्यामुळे एकूण टॅरिफ ५०% पर्यंत वाढले आहे. रशियन कच्चे तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे दंडात्मक कारवाई म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेरिकन प्रशासनाचे म्हणणे आहे.
भारताचा संकटात दिलेला हात
श्रीलंकेच्या आर्थिक संकटाच्या काळात भारताने केलेल्या मदतीची आठवण करून देत डी सिल्वा यांनी सांगितले की, भारताने २०१६ मध्ये भारतीय पाठिंब्याने सुरू झालेल्या श्रीलंकेच्या रुग्णवाहिका सेवेला ३.३ टन वैद्यकीय साहित्य पुरवले होते. तसेच आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
श्रीलंकेकडून आलेला हा पाठिंबा भारत-श्रीलंका मैत्रीच्या दृढ नात्याचा आणखी एक पुरावा ठरला आहे.
—————————————————————————————