कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे की, येत्या २८ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विविध भागांत निर्माण झालेली पूरस्थिती, अतिवृष्टी आणि त्या परिसरांमधील संपर्क तुटण्याच्या अडचणीमुळे त्या दिवशी परीक्षा घेणे शक्य नाही. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आता ९ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने याबाबत एक पत्रक जारी केले आहे. यात आयोगाने म्हटले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापिः राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. म्हणून ही परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण ३८५ पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील जवळपास ३ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जीवतोड मेहनत घेतलेली आहे, अशातच आता या परीक्षेच्या तयारीसाठी आणखी एक ते दीड महिना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.