नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवास गतवैभव प्राप्त व्हावे तसेच नागपंचमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने जिवंत नागाची पूजा करण्यासाठी कायदेशीर परवानगी मिळावी, अशी शिराळा परिसरातील जनतेची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन वन्यजीव संरक्षण कायद्यात विशेष दुरुस्ती करून शिराळ्याच्या परंपरेला मान्यता देण्याची मागणी केली.
या भेटीत आमदार देशमुख यांनी शिराळा नागपंचमीचा सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतानाच स्थानिक लोकभावनेचा आदर करून या परंपरेसाठी कायदेशीर आधार मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे केवळ एक धार्मिक परंपरा नव्हे तर संवेदनशीलतेने हाताळलेली सांस्कृतिक ओळख जपली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

बत्तीस शिराळ्याचा इतिहास-
बत्तीस शिराळ हे गाव सांगली जिल्ह्यात वसलेले असून पूर्वी याचे नाव हे ‘क्षियालय’ असे होते. शिवाजी महाराजांच्या कालखंडात या गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर सर्व खेड्यांचा मिळून महसूल जात असे. हे सर्व एकूण बत्तीस खेडे असल्यामुळे या गावाचे नाव बत्तीस शिराळा असे झाले. नागपंचमी या सणाला ज्या पद्धतीने सांस्कृतिक परंपरा आहे. त्याचप्रमाणे या गावाला ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.
अख्यायिका – महायोगी गोरक्षनाथांनी नागपंचमीच्या दिवसात नाग उत्सवाला सुरुवात केली. या उत्सवाला सुमारे हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी गावातल्या कोतवाल घराण्यातील मंडळी नाग पकडण्याचे कार्य करत असे. या पकडलेल्या नागाची पूजा गावातल्या महाजनांच्या घरी केली जात होती. नाग हे आदिमानवांचे आद्य दैवत मानले जाते. तसेच नाग हा मानव जातीचा रक्षक ही मानला जातो. गावातल्या काही लोकांच्या दबवाखाली द्रविडांच्यात नागपूजा सुरू केली गेली. अशा प्रकारच्या आख्यायिका सांगितल्या जातात. आशा या पवित्र सणांचे रूपांतर अनिष्ट रूढी परांपरांमध्ये झाले आणि आजही त्याचा अवलंब केला जातो. बत्तीस शिराळा या गावाजवळ चांदोली धरण आणि अभयारण्य आहे. त्यामुळे या भागात सर्प प्राण्याचे प्रमाण हे अधिक आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने या काळात सर्प हे त्यांच्या निवास्थानतून बाहेर पडत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाग दिसतात. २०१२ च्या आधीपर्यंत बत्तीस शिरळा गावात नागांची शर्यत नागपंचमीच्या निमित्ताने भरवली जात होती. परंतु या खेळामुळे नागांना इजा होत. त्यामुळे काही वन्यप्रेमींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि या खेळावर बंदी घालण्यात आली.
शिराळा नागपंचमी- नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित होत. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत असत.
शिराळा मतदारसंघातील नागपंचमीसह इतर विकासकामांशी संबंधित मागण्यांचे निवेदनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या पातळीवर चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार देशमुख यांनी यानंतर दिली.
शिराळा येथील नागपंचमी उत्सव हा महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरा आहे, ज्यामध्ये शेकडो वर्षांची धार्मिक आस्था आणि जनसहभाग आहे. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार जिवंत नागांची पूजा करण्यावर बंदी असल्याने ही परंपरा अडचणीत आली आहे. त्यामुळे स्थानिक जनतेच्या श्रद्धेचा विचार करून कायद्यात विशेष बाब म्हणून दुरुस्ती होणे आवश्यक असल्याची भूमिका या भेटीतून अधोरेखित झाली.