पन्हाळा : प्रतिनिधी
जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात आज जोतिबा डोंगरावर श्री. चोपडाई देवीच्या श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला. आज रात्रभर जोतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून उद्या पहाटे सहा वाजता धुपारती सोहळ्याने या यात्रेची सांगता होणार आहे.
जोतिबा डोंगरची चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा. श्रावण शुद्ध षष्ठीला चर्पटअंबेने रत्नासुराचा वध केला. त्यासमयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला, तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दूर्वा, बेल या गारवा देणाऱ्या फळा फुलांपासून पूजा केली होती, अशी अख्यायिका आहे.
तेव्हापासून आजतागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू, दूर्वा, बेल, फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते. यावेळी ज्याप्रमाणे लिंबूने देवीच्या अंगाचा दाह शांत केला. तसा भाविक भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेला भक्ताना लिंबूयुक्क्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देत असल्याचे चोपडाई देवीचे पूजारी यांनी सांगितले.
श्रावण षष्ठी यात्रेला भक्तांची जोतिबा डोंगरावर गर्दी होत असून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. यात्रेनिमित्त जोतिबा देवाची सिंहासन रूढ सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची आलंकारिक पूजा बांधण्यात आली आहे. भाविक षष्ठीचा उपवास करून चोपडाई देवीला पोषाख अर्पण करतात. मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूरातून हजारो भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत. धुपारती उद्या सकाळी ६ वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि धुपारती सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे.
—————————————————————————————-