As many as 20 researchers from Shivaji University have made their mark in the list of the top 2% of researchers in the world announced by the prestigious Stanford University in the US.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
संशोधन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या कामगिरीसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठाने २०२५ साली जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या २ टक्के संशोधकांच्या यादीत शिवाजी विद्यापीठातील तब्बल २० संशोधकांनी आपला ठसा उमटवला आहे. या यशामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कसून छाननीनंतर यादी जाहीर
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने या यादीसाठी संशोधनाची गुणवत्ता मोजण्यासाठी सायटेशन्स (Citation), एच निर्देशांक (H-Index), सहलेखकत्व (Co-authorship) तसेच संशोधन लेखकाची नेमकी भूमिका या महत्त्वपूर्ण घटकांचा विचार केला. जागतिक पातळीवरील सर्वसमावेशक मापनासाठी संयुक्त सूचक (C-Score) निर्देशांक तयार करून संशोधकांची निवड करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाचे जागतिक दर्जाचे संशोधक
या यादीत स्थान मिळवणाऱ्या संशोधकांमध्ये
पदार्थ विज्ञान विभाग : प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, निवृत्त प्रा. ए. व्ही. राव, निवृत्त प्रा. सी. एच. भोसले, डॉ. केशव राजपुरे, डॉ. विठोबा पाटील, डॉ. अण्णासाहेब मोहोळकर, डॉ. संजय लठ्ठे, डॉ. शरदराव व्हनाळकर, डॉ. तेजस्विनी भट, डॉ. मानसिंग टाकळे.
रसायनशास्त्र विभाग : डॉ. सागर डेळेकर, डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ. हेमराज यादव, डॉ. अनिल घुले.
जैव रसायन शास्त्र विभाग : निवृत्त प्रा. डॉ. संजय गोविंदवार, डॉ. ज्योती जाधव.
नॅनो सायन्स विभाग : डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. सुशीलकुमार जाधव.
जैवतंत्रज्ञान विभाग : डॉ. के. के. पवार, सचिन ओतारी.
‘फॅब फाईव्ह’चा दुहेरी सन्मान
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने संशोधन क्षेत्रातील सर्वकालिक कामगिरीच्या आधारेही एक स्वतंत्र यादी तयार केली आहे. या यादीत शिवाजी विद्यापीठातील डॉ. प्रमोद पाटील, डॉ. ए. व्ही. राव, डॉ. केशव राजपुरे, डॉ. ज्योती जाधव आणि डॉ. सी. एच. भोसले या पाच संशोधकांनी आपले स्थान मिळवत ‘फॅब फाईव्ह’ म्हणून विशेष गौरव मिळवला आहे.
विद्यापीठाचा गौरव या यशाबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, “ या संशोधकांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळवणे ही कौतुकास्पद बाब आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी अव्याहतपणे केलेलं संशोधन आणि कष्टाचं हे फलित आहे. त्यांनी विद्यापीठात संशोधनासाठी एक शिस्त व उत्तम परंपरा निर्माण केली आहे.”
या अद्वितीय यशामुळे कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर शिवाजी विद्यापीठाचा जागतिक दर्जाचा ठसा अधिक गडद झाला आहे.