नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुरू असलेला ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आज सोमवारी (१४ जुलै) रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट संकेत दिले की, आता या खटल्याचा अंतिम सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर येत्या ऑगस्ट महिन्यात मुख्य सुनावणी होणार असून, २०२५ साल संपण्यापूर्वी अंतिम निकाल देण्यात येईल, अशी शक्यता आहे.
ठाकरे गटाला दिलासा ?
या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाली असून यापुढे नव्याने अर्ज करणे टाळावे. त्यामुळे या प्रकरणाची झपाट्याने सुनावणी करून अंतिम निर्णय दिला जाईल, असे संकेत न्यायालयाने दिले आहेत. यामुळे निकाल रखडणार नसल्याचे स्पष्ट झाले असून उद्धव ठाकरे गटासाठी ही बाब दिलासादायक मानली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच सुनावणी ?
महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महानगरपालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, अशा परिस्थितीत शिवसेनेच्या पक्ष नाव आणि चिन्हा बाबतचा वाद निकालात येण्याआधीच निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय निकाल राखून ठेवू शकते, आणि निवडणुकांनंतर अंतिम निकाल देईल, अशी माहिती मिळते.
दोन्ही गटांचा युक्तिवाद
या सुनावणीत शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी बाजू मांडली, तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि रोहित शर्मा यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाच्या वकिलांनी आरोप केला की, “ठाकरे गटाने दोन वर्षांमध्ये काहीच केलं नाही. आता निवडणुका जवळ आल्यावरच हालचाल करत आहेत.” यावर न्यायालयाने स्पष्ट केले, “दोन वर्षे झाली आहेत, आता हे प्रकरण अंतिम टप्प्यात न्यायालयात सोडवायलाच हवे.”
पुढील टप्पे काय ?
न्यायालयाने म्हटले की, ऑगस्ट महिन्यात सुनावणीसाठी तारीख दोन-तीन दिवसांत जाहीर केली जाईल. त्यानंतर एका ते दोन दिवसांत युक्तिवाद पूर्ण होतील. यानंतर निकाल राखून ठेवला जाईल आणि योग्य वेळी जाहीर केला जाईल.
या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागले असून, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडेच राहणार की उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत निर्णायक ठरेल, यात शंका नाही.
——————————————————————————–