कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
एकीकडे शिक्षण जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच दुसऱ्या बाजूला एका विशिष्ट तरुण वयात रोजगार ही महत्त्वाचा असल्याचे सांगून तरुणांना कामात गुंतवून त्यांना भविष्य घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास विभाग व विवेकानंद संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. या मेळाव्यात ४३ जणांची अंतिम निवड झाली.
उपस्थिती- स्वामी विवेकानंद संस्थेचे अभयकुमार साळुंखे, सहायक आयुक्त कौशल्य विकास जमीर करीम, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, गोकुळ एमआयडीसीचे अध्यक्ष स्वरूप कदम, स्वामी विवेकानंद संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्यासह विविध उद्योजकांचे प्रतिनिधी, उमेदवार तरुण, विवेकानंद संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री अबिटकर- कौशल्य विभागाने औद्योगिक विकास महामंडळाच्या मदतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातील संधीचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून तरुणांना सहा हजार, आठ हजार, दहा हजार अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्टायफंड देण्यात येतो. ही योजना तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असताना अधिकचे बळ देणारी आहे असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात एकूण ६३६ उमेदवार होते. पात्रतेनुसार ३६० मुलाखती झाल्या त्यापैकी प्राथमिक निवड २४७ तर अंतिम निवड ४३ जणांची झाली.
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाबाबत माहिती देऊन तरुणांचा पुणे मुंबईकडे असणारा नोकरीचा कल कोल्हापूरकडे वाढावा यासाठी अधिकचे प्रयत्न व्हावेत असे मत व्यक्त केले. सीईओ कौस्तुभ गावडे यांनी तरुणांचा देश असलेल्या देशात प्रत्येकाला नोकरी मिळावी व अशा मेळाव्या मधूनही संधी उपलब्ध होत असल्याचे सांगून हा एक आदर्श उपक्रम असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जमीर करीम यांनी केले.
————————————————————————————-






