कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या भावनांची पद्धतशीरपणे पायमल्ली होत असून, या प्रकल्पातून तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “शक्तिपीठ महामार्गाच्या रचनेतून शेतकऱ्यांची जमिनी जबरदस्तीने घेण्याचा डाव सरकारने आखला आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनींचा सौदा केला जात आहे आणि काही ठराविक लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरली जात आहे.”
शेट्टी यांनी पुढे सांगितले की, या महामार्गासाठी सरसकट जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. उलट, कागदोपत्री दाखवले जाणारे भाव आणि प्रत्यक्ष दिले जाणारे पैसे यात मोठा फरक आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार ५० हजार कोटींच्या घोटाळ्याकडे निर्देश करतो, असा आरोप त्यांनी केला.
“आम्ही विकासाला विरोध करत नाही, पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पिढीजात जमिनी बळकावल्या जात असतील तर याचा आम्ही तीव्र विरोध करू,” असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यांनी सरकारकडे या प्रकल्पातील पारदर्शकता ठेवण्याची आणि शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्याची मागणी केली.
———————————————————————————————-